जिवंत सापडलेल्या दोघांवर इस्पितळात उपचार -हवाई दल-एनडीआरएफच्या मोहिमेला मोठे यश
लमखागा / वृत्तसंस्था
उत्तराखंडमधील लमखागा पास येथे झालेल्या हिमस्खलन दुर्घटनेतील 12 मृतदेह शनिवारी सापडले. या परिसरात 18 ऑक्टोबर रोजी मोठय़ा प्रमाणावर हिमवृष्टी झाल्यानंतर पर्यटक, पोर्टर (हमाल) अशा एकंदर 17 गिर्यारोहकांशी असलेला संपर्क तुटला होता. भारताच्या वायुदलाने लमखागा पास येथे 17 हजार फुटांच्या उंचीवर शोधकार्य सुरू केले होते. या बचाव-शोध मोहिमेला शनिवारी मोठे यश मिळाले. 12 मृतदेह आणि दोन जिवंत व्यक्ती अशा 14 जणांना बेस कॅम्पवर आणण्यात आले. तिथून मृतदेह शवागारात तर जिवंत व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उर्वरित व्यक्तींसाठी शोधकार्य सुरू आहे.
लमखागा पास हा उत्तराखंडच्या हरसिल जिल्हय़ाला हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिह्याशी जोडतो. हिमवृष्टी झाल्यामुळे लमखागा पास परिसरात गेलेल्या 17 जणांशी संपर्क होत नसल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने हवाई दलाला दिली. तसेच शोधकार्यासाठी मदत मागितल्यानंतर 20 ऑक्टोबरपासून शोधमोहीम सुरू करण्यात आली. शोधकार्य सुरू झाल्यापासून आतापर्यंत 12 जणांचे मृतेदह सापडले आहेत.
हवाई दलाची दोन हलक्मया वजनाची हेलिकॉप्टर आणि एनडीआरएफचे तीन सदस्य संयुक्तपणे शोधकार्य करत होते. शोधकार्याची सुरुवात लमखागा पास परिसरात 19 हजार 500 फुटांच्या उंचीवर झाली. या शोधमोहिमेत एसडीआरएफचे पथक 21 ऑक्टोबर रोजी सहभागी झाले. वेगवेगळय़ा उंचीवर एकाचवेळी शोधकार्य सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार डोगरा स्काऊट्स, 4 आसाम रायफल्स आणि दोन आयटीबीपी पथके यांनीही शोधकार्य सुरू केले. या मोहिमेला दोन-तीन दिवसातच यश प्राप्त झाले.









