अध्याय सातवा
जो माणूस भगवंतावर दृढविश्वास ठेवेल आणि सतत त्यांचे चिंतन करेल त्याचा उद्धार याच जन्मी झाल्याशिवाय राहणार नाही हे रहस्य मागील भागात भगवंतानी उद्धवाला सांगितले. जरी भगवंतांनी सांगितले तरी माणसाला पटतेच असे कुठे आहे, पण ऐकणारा उद्धव असल्यामुळे तो ते संपूर्ण ऐकून अमलात आणेल अशी भगवंतांना खात्री होती. त्यामुळे ते समरसून सांगत आहेत. ते म्हणाले, ‘ऊ” उद्धवा, पशुपक्ष्यांनासुद्धा हित, अहित कशात आहे हे माहीत असते मग माणसाला कळत नाही असे कसे म्हणता येईल? तरीसुद्धा नरदेहातले इंगित कळले नाही म्हणून काही लोकांचा नरदेह वाया जातो. तर काहींचा माझ्या सांगण्यावर विश्वास नसतो. कुणाला ज्ञानाचा गर्व झालेला असतो तर कुणी विषयाला भुलतो. कुणाला तो करत असलेल्या साधनेचा अभिमान असतो तर कुणी काय घाई आहे करू प्रयत्न सावकाश असे आयुष्यभर नुसते म्हणत राहतात. बरे चांगले वाईट मनाला कळले तरी विषयवासना संपत नसल्याने माझे स्मरण करायचे विसरतात. आता तुझेच बघ, काळाने तुझी बाल्यावस्था गिळून टाकली. तारुण्य ओसरून वृद्धावस्था आली. तीही हळूहळू संपून जाईल. मिनिटा-मिनिटाने काळ वाया जात आहे. काहीही परमार्थ न साधता जन्ममरणाच्या आवर्तनात जाऊन अनर्थ ओढवून घेत आहेस. स्वर्ग, नरक, कर्म, ब्रह्म या सगळय़ाची प्राप्ती मनुष्य देहातच शक्मय आहे म्हणून पापकर्म टाळून मोक्षधर्म धरावा असा विवेक ज्यांच्याकडे आहे ते वैराग्याची कास धरतात आणि हे ज्यांना कळले ते स्वतःच स्वतःचे गुरु होतात. मग त्यांच्या बुद्धीत मी ज्ञानज्योतीचा प्रकाश पाडतो. येथे केवळ बुद्धी निर्मळ हवी म्हणजे आत्मबोध तत्काळ होऊन नरदेह सफळ होतो. आपल्या कर्माने आपण तरून जाऊ की नाही हे ज्याचे त्याला कळत असते, त्यामुळे तो अशुभ वासना सोडून देतो. संसाराविषयी त्याच्या मनात मोह राहात नाही. तो पापकर्म बरोबर चुकवतो. मृत्यूलोकातील भोगाविषयी तो विरक्त होतो. तसेच स्वर्गाचेही त्याला आकर्षण वाटत नसते कारण काही काळाने तेथूनही परत यावे लागते हे त्याला माहीत असते. अनावर होणाऱया विषय वासना सुटाव्यात म्हणून तो माझे चिंतन करतो. असे मनुष्य देहधारी माझा अभ्यास करतात, माझ्याबद्दल अनुमाने बांधतात, तर्क करतात पण नुसत्या अभ्यासाने मी त्यांना वश होत नाही, तर जे कोणी अभिमान त्यागून माझे स्वरूप पाहतात त्यांनाच माझा अनुभव येतो. ज्यांचे अंतःकरण निर्मळ असते त्यांना त्यांच्या शरीरातील माझे अस्तित्व जाणवते. मी पृथ्वीवर अनेक शरीरे निर्माण केली पण मला मनुष्यदेहाची फार आवड आहे कारण त्या शरीरातील जीव सत्वर मद्रुप होतो. तुला ऐकून आश्चर्य वाटेल पण मद्रुप होण्यासाठी देव देवतासुद्धा मनुष्य देहाची अपेक्षा करतात. मनुष्य देह लाभल्याशिवाय त्यांचाही उद्धार होऊ शकत नाही. कर्म, ज्ञान आणि भक्ती हे जे आत्मज्ञान होण्याचे मार्ग आहेत ते सद्गुरुंच्या उपदेशाने चोखाळण्यासाठी मनुष्यदेह धारण करणे आवश्यक आहे हे मी वारंवार सांगूनसुद्धा बहुतांशी लोक माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून त्यांना लाभलेले नरदेहरूपी घबाड वाया घालवतात.







