मुबलक साठय़ामुळे यंदा लाभार्थी भागांना पाणीपुरवठा सुरळीत
प्रतिनिधी/ संकेश्वर
राजा लखनगौडा जलाशयात सध्या 29 टीएमसी पाण्याचा साठा आहे. गत 5 वर्षाच्या काळात यंदा सर्वाधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे जलाशयाच्या लाभार्थी भागात मुबलक पाणीपुरवठा केला जात असून, पुढील आठवडय़ापासून जीएलबीसी कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
हिडकल जलाशयातून संकेश्वर, हुक्केरी, व बेळगाव शहरासाठी दररोज 60 क्युसेक्स तर चिकोडी बॅंच पॅनॉल व घटप्रभा राईट बॅँच पॅनॉलसाठी 2500 क्युसेक्स पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळी हंगामात जलाशय 51 टीएमसी क्षमतेनी भरला होता. गत चार महिन्यात 22 टीएमसी इतका पाणीपुरवठा लाभार्थी भागात केला आहे. सध्या उपलब्ध असणारा 29 टीएमसी पाणी साठा जुलै अखेरपर्यंत लाभार्थी भागांना पुरेल असा अंदाज आहे. यंदा लाभार्थी भागात कुठेही पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली.
हिडकल जलाशयाच्या मागील बाजूस असणाऱया घटप्रभा नदीचे पात्र काहीअंशी कोरडे पडले आहे. तर हिरण्यकेशी, मार्कंडेय व ताम्रपर्णी या नद्यांच्या पात्रांनीही तळ गाठला आहे. नुकतीच आमदार उमेश कत्ती यांनी तालुका पातळीवर अधिकाऱयांची बैठक घेऊन तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा अशी सूचना दिली आहे. तथापि हरगापूरगड, कणगला, करजगा, बाड, बाडवाडी आदी गावांना वर्षाकाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यंदाही उन्हाळी हंगामात पाणी पुरवठा करण्याची तयारी तालुका प्रशासनाला ठेवावी लागणार आहे.









