रस्ते परिवहन मंत्रालयाकडून नियमांमध्ये बदल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
1 एप्रिलपासून आता हिट अँड रन घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना भरपाईदाखल 2 लाख रुपये मिळणार आहेत. रस्ते परिवहन मंत्रालयाने नियमांमध्ये बदल करत नवा आदेश जारी केला आहे. पूर्वी पीडिताच्या कुटुंबियांना भरपाईदाखल 25 हजार रुपये देण्यात येत होते. आता भरपाईची रक्कम 8 पट वाढविण्यात आली आहे.
रस्ते परिवहन मंत्रालयाच्या नव्या नियमानुसार पीडित आणि त्याच्या कुटुंबियांना भरपाईची रक्कम 3 महिन्यांच्या आता त्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करत द्यावी लागणार आहे. यापूर्वी सरकारने हिट अँड रन प्रकरणी पीडितांच्या कुटुंबियांना अधिक भरपाई रक्कम देण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयात म्हटले होते. नॅशनल रेकॉर्ड ब्युरोनुसार 2020 मध्ये 45 हजार मृत्यू हिट अँड रन घटनांमुळे झाले होते.
मोटर व्हेईकल ऍक्सिडेंट फंड
परिवहन मंत्रालयाने हिट अँड रन प्रकरणासोबत दुर्घटनाग्रस्त लोकांच्या कुटुंबियांसाठी अधिसूचना काढली आहे. यानुसार गंभीर जखमी व्यक्तीला भरपाईदाखल 2.5 लाख रुपये आणि मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 5 लाख रुपयांची तत्काळ मदत केली जाणार आहे. मंत्रालयाच्या नव्या आदेशानुसार लवकरच एक मोटर व्हेईकल ऍक्सिडेंट फंडची स्थापना करण्यात येणार आहे. या फंडच्या माध्यमातून पीडित कुटुंबाला तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.









