96 वर्षीय होलोकॉस्ट सर्व्हाइवरचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू : युक्रेन शोकाकुल
96 वर्षीय होलोकॉस्ट सर्व्हाइवर रोमनचेंके यांचा युक्रेनच्या खारकीव्ह शहरात रशियाच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. दुसऱया महायुद्धाच्या मृतांच्या स्मरणार्थ निर्मित बुचेनवाल्ड कॉन्स्ट्रेशन कॅम्प स्मारकाने युक्रेनच्या युद्धात बोरिस रोमनचेंको यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. रोमनचेंको राहत असलेल्या बहुमजली इमारतीवर रशियाकडून गोळीबार करण्यात आला होता.
युक्रेनचे दुसऱया क्रमांकाचे शहर खारकीव्ह रशियाच्या तोफखान्याच्या माऱयामुळे संकटात सापडले आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनला निशस्त्र आणि नाझीमुक्त करणार असल्याचे म्हणत युद्ध पुकारले आहे. बोरिस रोमनचेंको हे छळछावण्यांमधून सुखरुप परतले होते. परंतु रशियाच्या हल्ल्यात त्यांना जीव गमवावा लागला असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी म्हटले आहे.

रोमनचेंको यांचा जन्म 20 जानेवारी 1926 रोजी सुमी शहरानजीक बोंडारीमध्ये झाला होता. 1942 मध्ये त्यांना डॉर्टमुंड निर्वासित करण्यात आले होते, जेथे त्यांना बळजबरीने खाणकाम करावे लागले होते. पलायनाच्या अयशस्वी प्रयत्नानंतर 1943 त्यांना बुचेनवाल्ड कॉन्स्ट्रेशन कॅम्पमध्ये पाठविण्यात आले. तेथे दुसऱया महायुद्धादरम्यान 53 हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. रोमनचेंको त्यांना त्यात बाल्टिक समुद्रातील बेट पीनम्यूंडेमध्ये पाठविण्यात आले होते. बर्गन-बेल्सन कॉन्स्ट्रेशन कॅम्पमध्ये त्यांनी वेठबिगार म्हणूनही काम केले होते.
युक्रेनच्या विदेश आणि संरक्षण मंत्रालयाने रोमनचेंको यांच्या मृत्यूप्रकरणी रशियाची निंदा केली आहे. हिटलरला जे करता आले नाही ते पुतीन करू शकल्याचे म्हणत संरक्षण मंत्रालयाने त्यांना लक्ष्य केले आहे.









