खलिस्तानी दहशतवादी संघटनेची घेतोय मदत
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हिजाब अन् भगव्या स्कार्फसंबंधीचा वाद कर्नाटकात सुरू असला तरीही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय हा मुद्दा पेटवून त्याला सांप्रदायिक स्वरुप देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रतिबंधित खलिस्तानी संघटना शिख्स फॉर जस्टिसचा (एसजेएफ) आयएसआय याकरता वापर करत असल्याचे गुप्तचर संस्थांच्या इनपूट्समध्ये म्हटले गेले आहे.
आयएसआय भारतात हिजाब संधी जनमत चाचणीची संकल्पना सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे रेटू पाहत असल्याचे गुप्तचर संस्थांच्या इनपुट्सद्वारे समोर आले आहे. एसएफजे या दहशतवादी गटाच्या माध्यमातून आयएसआय हिजाबसंबंधी कथित जनमत चाचणी घडवून आणण्याच्या प्रयत्नांकडे पोलीस तसेच कायदा अंमलबजावणी यंत्रणेने बारकाईने नजर ठेवावी अशी सूचना इंटेलिजेन्स ब्युरोने केली आहे.
शिख्स फॉर जस्टिस या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख गुरुपतवंत सिंह पन्नूकडून आयोजित केल्या जाणाऱया हिजाबसंबंधीच्या कथित जनमत चाचणी आणि उर्दूस्तान या संकल्पनेला काही भारतविरोधी घटकांकडून बळ मिळू शकते असेही गुप्तचर यंत्रणांनी इशाऱयात नमूद केले आहे.
एसएफजेने भारतातील मुस्लिमांना ‘हिजाब जनमत चाचणी’ सुरू करण्याची हाक दिली आहे. तसेच राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधून ‘उर्दूस्तान’ वेगळा करण्याची चळवळ सुरू करण्यास सांगत एसएफजेच्या माध्यमातून आयएसआयने एकप्रकारे देशाला विभागण्याचा कट रचला आहे.
एसएफजे प्रमुखाने व्हिडीओरुपी संदेशाद्वारे भारतीय मुस्लिमांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतंत्र उर्दूस्तानकरता एसएफजे पैसे पुरविणार असल्याचेही संदेशात म्हटले गेले आहे. हिजाब जनमत चाचणी विषयक कथित ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्मचे काही स्क्रीनशॉट्स आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. गुरपतवंत सिंह पन्नूचे भाषण धार्मिक सलोखा बिघडविण्यासाठी वापरले जात असल्याचे गुप्तचर यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.









