हिजाब उतरविल्यानंतर विद्यार्थिनींना वर्गात बसण्यास परवानगी
प्रतिनिधी /बेळगाव
काही विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्याने सोमवारी सरदार्स हायस्कूलमध्ये गोंधळ उडाला. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱयांनी शाळेला भेट दिल्यानंतर गोंधळ निवळला. हिजाब उतरविल्यानंतर सदर विद्यार्थिनींना वर्गात बसण्यास परवानगी देण्यात आली. पण दिवसभर या प्रकाराची शहरात चर्चा होती.
सोमवारपासून नववी व दहावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर सरदार्स हायस्कूलमध्ये दहावीच्या काही विद्यार्थिनी सकाळी हिजाब परिधान करून आल्या. त्यांना पोलीस, शिक्षक आणि सहकारी विद्यार्थ्यांनी हटकल्यानंतर काहीकाळ गोंधळ उडाला. परिधान केलेला हिजाब नसून स्कार्फ असल्याचे त्या विद्यार्थिनींचे म्हणणे होते. पण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळेतील एका वर्गखोलीत त्यांना हिजाब उतरवून वर्गात बसण्यास सांगण्यात आले. महिला पोलीस कर्मचाऱयांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींनी हिजाब उतरविले.
‘त्या’ विद्यार्थिनींनी शाळा प्रशासनाच्या सूचनेनुसार हिजाब उतरवून वर्गात प्रवेश केला. त्यानंतर गोंधळ निवळून प्रकरणावर पडदा पडला. परंतु, काही वृत्तवाहिन्यांच्या आततायीपणामुळे जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली. लागलीच जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या आणि जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी शाळेला भेट दिली. परिस्थितीची पाहणी करून शाळा प्रशासन आणि शिक्षकांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना केली.
या घटनेनंतर शाळा आवारात बंदोबस्त वाढविण्यात आला. दिवसभर सर्व वर्ग सुरळीत चालले. त्यामुळे शिक्षकांनी निःश्वास सोडला.
सूचना देऊनही…
नववी व दहावीचे वर्ग सुरू होण्यापूर्वी रविवारी शाळेकडून गुगल मिटद्वारे पालकांशी संपर्क साधण्यात आला होता. न्यायालयाचा आदेश असल्याने मुलींना हिजाब परिधान करून शाळेत पाठविल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला होता. तरीही पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने शिक्षकांची पुरती तारांबळ उडाली.
वातावरण गढूळ करू नका
कोरोना महामारीच्या काळात मास्कऐवजी स्कार्फ गुंडाळून घेण्याची फॅशन आली आहे. त्यातच हिजाबवरून वाद सुरू आहे. सरदार्समधील घटना हा याचाच परिपाक आहे. त्यामुळे त्याबाबत विपर्यास करून वातावरण गढूळ करू नये. तसेच विद्यार्थिनींनी केवळ शाळेचा गणवेश परिधान करावा. संशयास्पद कपडे परिधान करू नयेत.
– बसवराज नलतवाड, जिल्हा शिक्षणाधिकारी









