अफगाणमधील प्रसारमाध्यमांचे स्वरुपच बदलले
अफगाणिस्तानवर कब्जा करण्यासह तालिबानने देशातील प्रसारमाध्यमांवर नियंत्रण मिळविले आहे. यामुळे अफगाणमधील वृत्तवाहिन्या आणि संकेतस्थळांचे स्वरुप पूर्णपणे बदलले आहे. सर्व वाहिन्यांनी आता संगीत तसेच त्याच्याशी संबंधित मनोरंजनाचे कार्यक्रम दाखविणे बंद केले आहे. टीव्हीवर आता धार्मिक आणि जिहादी कार्यक्रमच प्रसारित केले जात आहेत. वृत्तवाहिन्यांवर केवळ तालिबानी नेत्यांचा उदोउदो केला जात आहे.
तालिबानने सर्वप्रथम 2 ऑगस्ट 2021 रोजी हेलमंड येथील राष्ट्रीय रेडिओ स्टेशनवर कब्जा केला होता. त्यानंतर वेगाने देशातील अन्य टीव्ही वाहिन्यांवरही स्वतःचे नियंत्रण आणून प्रसारण रोखले आहे. वाहिन्यांनी तालिबानच्या विचारसरणीनुरुप स्वतःचे कार्यक्रम बदलले आहेत. कार्यक्रमांमध्ये शरीया कायद्याविषयी सांगण्यात येत आहे. तसेच टीव्हीवर शरीयत कायद्यांचे लाभ सांगितले जात आहेत.
तालिबानच्या भीतीने महिला कर्मचारी आणि अँकर्सनी आता अनिवार्य स्वरुपात हिजाब परिधान करण्यास प्रारंभ केला आहे. तर अनेक अँकर्सनी नोकरीच सोडली आहे. तालिबान आता प्रसारमाध्यमांचा वापर करण्यास तरबेज झाला आहे. याचमुळे तालिबानने आंतरराष्ट्रीय वाहिनी अल-जझिराला विशेष अनुमती देत मुलाखतींचा सपाटा चालविला आहे.
तालिबानच्या राजवटीचा परिणाम चित्रपट उद्योगासह सर्वसामान्यांवरही दिसून येत आहे. लोकांनी सोशल मीडिया अकौंटवरील स्वतःची छायाचित्रे डिलिट करण्यास प्रारंभ केला आहे. अफगाण चित्रपटसृष्टीने मागील काही काळात जगभरातून प्रशंसा प्राप्त करत अनेक प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले होते. 2003 मध्ये तयार करण्यात आलेल्या ‘ओसामा’ या चित्रपटाने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविला होता. पण तालिबानच्या पुनरागमनामुळे अफगाण चित्रपटसृष्टीवर संकटाचे ढग घोंगावू लागले आहेत.
प्रसारमाध्यमांप्रकरणी समिती स्थापन करणार असल्याचे तालिबानने सांगितले आहे. या तीन सदस्यीय समितीत तालिबानचा एक प्रतिनिधी, प्रसारमाध्यम सुरक्षा महासंघाचा उपप्रमुख आणि काबूल पोलीस विभागाचा एक अधिकारी सामील असेल अशी माहिती तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने दिली आहे.









