सेनादलांची संयुक्त कारवाई
वृत्तसंस्था/ श्रीनगर
दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्हय़ात दमहल हांजीपोरा भागात शनिवारी सकाळी सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी एकत्रित कामगिरी करत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांना मारले आहे. खल बटपोरा भागातील मनगोरी इलाक्यात हे दहशतवादी लपून बसले होते. सुरक्षा दलांनी नाकाबंदी केल्यावर दहशतवाद्यांनी थेट गोळीबार सुरु केला. त्याला उत्तर देताना जवानांनी चौघांचा खात्मा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी स्थानिक गावकऱयांना टार्गेट करत होते. या बारा दिवसांत चार ग्रामस्थाची त्यांनी हत्या केली आहे.मात्र शनिवारी पहाटे सुरक्षा दलांनी जोरदार कारवाई करत हिजबुलच्या चार दहशतवाद्यांना मारले. यातील दोन स्थानिक दहशतवादी आहेत तर दोघांची ओळख पटलेली नाही. या संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली असून शोध मोहिम सुरु आहे.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी संभाग हंदवाडा येथे सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना पकडले आहे. ते सर्व लष्कर ए तोयबाचे आहेत त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त केला आहे. या दहशतवाद्यांना मदत करणाऱया दोघांना सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे. त्याचबरोबर सोपोर शहरातील दहशतवाद्यांना मदत करणाऱयांना दोघांना पोलीस व सेनादलाच्या जवानांनी अटक केली आहे. सोपोरचे एसपी जावीद इकबाल यांनी सांगितले की, दहशतवाद्यांची स्थानिकांशी असलेली नाळ यामुळे तुटण्यास मदत होणार आहे. या चौघांकडून मोठय़ा प्रमाणात हत्यारे जप्त केली असून अजून कोणाचा संबंध व संपर्क आहे, त्याची चौकशी केली जात असल्याचे सांगितले.