सीसीबीकडून शोध सुरू : संपतराज यांनी उपचार घेतलेल्या इस्पितळाला नोटीस
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या के. जे. हळ्ळी आणि डी. जे. हळ्ळी येथील हिंसाचार प्रकरणात माजी महापौर संपतराज यांच्यावरही आरोप असून पोलीस ते चौकशीसाठी हजर राहण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समजते. आपल्याला कोरोना संसर्ग झाल्यामुळे सध्यातरी चौकशीसाठी हजर राहू शकत नसल्याचे संपतराज यांनी पोलिसांना सांगितले होते. दरम्यान, संपतराज उपचार घेतलेल्या हेब्बाळ येथील बापिस्ट इस्पितळातून बेपत्ता झाले असून सीसीबी पोलिसांनी आता इस्पितळालाच नोटीस जारी केली आहे.
गुरुवारी सीसीबी पोलिसांच्या पथकाने इस्पितळाला भेट दिल्यानंतर संपतराज बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्यामुळे सीसीबी पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. शिवाय संपतराज यांनी उपचार घेतलेल्या इस्पितळावर कारवाई करण्यास सरसावले आहेत. अटकेच्या भितीमुळे संपतराज यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून बापिस्ट इस्पितळात दाखल झाले होते.
काही दिवसांनंतर सीसीबी पोलिसांनी इस्पितळाला भेट देऊन संपतराज यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. तसेच त्यांना डिस्चार्ज देताना आपल्याला माहिती द्यावी, अशी सूचना इस्पितळ व्यवस्थापनाला दिली होती. मात्र, इस्पितळाने पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. आरोग्य खात्याला पत्र पाठवून संपतराज यांच्या आरोग्याविषयी माहिती घ्यावी, असे पोलिसांना सांगितले आहे.









