नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील जहांगीरपूर येथे हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी कडक पावले उचलल्याने तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. तणावाला उग्र स्वरुप येऊ नये यासाठी तपासही गतिमान करण्यात आला आहे. हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत जवळपास 20 जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी चौकशीनंतर रोहिणी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी अन्सार व अस्लम यांना पोलीस कोठडी तर अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांची ‘क्राईम ब्रान्च’ (गुन्हे शाखा) आता या हिंसाचाराचा तपास करणार आहे.
हनुमान जन्मोत्सव मिरवणूक सुरू असताना झालेल्या दगडफेक आणि गोळीबारानंतर शनिवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. पोलिसांची दहा पथके या हिंसाचाराचा तपास करत आहेत. गोळीबार करणाऱया अन्सार-अस्लमसह 20 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये दोघे अल्पवयीन आहेत. त्यांच्या ताब्यातून 3 पिस्तूल आणि 5 तलवारी जप्त करण्यात आल्याचे दिल्ली पोलीस दलातील एका अधिकाऱयाने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असली तरी परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तेथे आरएएफच्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्लीतील सर्व संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस तैनात असून येथे हाय अलर्ट आहे.
एफआयआर दाखल
जहांगीरपुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी राजीव रंजन सिंह यांनी एफआयआरमध्ये केलेल्या नोंदीनुसार मिरवणूक जामा मशिदीजवळ पोहोचताच दोन गटांमध्ये वादावादी झाली. हा वाद इतका वाढला की त्यानंतर काही वेळातच दगडफेक सुरू झाली. त्यातच गोळीबार झाल्यानंतर हिंसाचार अधिकच उफाळला होता. हिंसाचारात प्रत्यक्ष सहभागी असणाऱयांवर कडक कारवाई केली जाईल, असे अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
शांततापूर्ण मिरवणुकीत धुडगूस
शनिवारी सायंकाळी 4.15 वाजता जहांगीरपुरी येथून मिरवणूक निघाली, ती बीजेआरएम हॉस्पिटल रोड, बीसी मार्केट, कुशल चौक मार्गे महेंद्र पार्क येथे संपणार होती. मिरवणूक शांततेत सुरू होती. सायंकाळी सहाच्या सुमारास ही मिरवणूक जामा मशिदीजवळ येताच अन्सार नावाचा एक व्यक्ती 4-5 साथीदारांसह आला आणि मिरवणुकीत सहभागी लोकांशी वाद घालू लागला. वादावादी वाढत असताना दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाल्याने मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली.
व्हिडीओ फुटेजद्वारे तपास
मिरवणुकीत दगडफेकीसह गोळीबार झाला होता. गोळीबार करणाऱया आरोपी अन्सारला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर संपूर्ण परिसरात आरएएफ तैनात करण्यात आले आहे. पोलीस पथकाने परिसरातील अनेक व्हिडीओ फुटेज मिळवले आहेत. यातील बऱयाच लोकांची ओळख पटली आहे.
पोलीस-शांतता समितीची बैठक
हिंसाचारात 8 पोलीस कर्मचाऱयांसह काही नागरिक जखमी झाले आहेत. धुडगूस घालणाऱया टोळक्याने केलेल्या गोळीबारादरम्यान एक उपनिरीक्षक गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारत आहे, असे उत्तर-पश्चिम विभागाचे डीसीपी उषा रंगनानी यांनी सांगितले. दरम्यान, हिंसाचारानंतर अमन समितीची बैठक झाली असून लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
हिंसाचारानंतर संपूर्ण परिसरावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितले. तसेच शांतता राखण्याचे आणि अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेने केले आहे. सुरक्षेसाठी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.









