प्रतिनिधी / कोल्हापूर
बडे राजकीय नेते, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनिअर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवासस्थाने असणाऱया रूईकर कॉलनीतील हिंद को-ऑप हाऊसिंग सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीचा निकाल रविवारी लागला. माजी उपमहापौर प्रकाश पाटील यांच्या सतारूढ हिंद परिवार पॅनेलचा पराभव, प्रशांत घोडके यांच्या नवनिर्वाचित हिंद सोसायटी विकास पॅनेलने करून ते सतेवर आले. 15 वर्षानंतर या बिनविरोध निवडणूकीची परंपरा खंडीत झाली. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत, हिंद को-ऑप सोसायटी हॉलमध्ये हे मतदान झाले. मतदानानंतर निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक अधिकारी म्हणून व्ही.एम. तोडकर यांनी काम पाहीले.
रूईकर यांनी 1946 मध्ये रूईकर कॉलनीची उभारणी केली. या कॉलनीत ज्येष्ठ नेते विचारवंत डॉ. एन. डी. पाटील, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, निवेदिता माने, धनंजय महाडिक यांच्यासह विद्यमान खासदार संजय मंडलिक, धैर्यशिल माने, माजी आमदार रविंद्र सबनीस, महादेवराव महाडिक, अमल महाडिक, ज्येष्ठ नेते एच. डी. बाबा पाटील आदी राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवासस्थाने आहेत. शहरातील बडे वकील, डॉक्टर, इंजिनिअर, सीए, उद्योजक या ठिकाणी राहतात. आजवर ही निवडणूक बिनविरोध होत होती.
हिंद विकास विरूद्ध हिंद परिवार पॅनेलमध्ये लढत
एकूण 15 जागांसाठी ही निवडणूक होती.. पण अनुसुचित जातीचा उमेदवार नसल्याने तसेच, एनटीच्या जागी सुनील व्यंकाप्पा भोसले यांची बिनविरोध निवड झाल्याने, 13 जागांसाठी हे मतदान झाले. या निवडणुकीत हिंद विकास पॅनेल आणि हिंद परिवार पॅनेल या दोन पॅनेलमध्ये सरळ लढत झाली.s. या निवडणूकीत जुन्या सत्ताधारी पॅनेलमधील सहा जण हिंद विकास पॅनेलमध्ये तर पाच जण हिंद परिवार पॅनेलमध्ये उतरले होते. विशेष म्हणजे या पॅनेलमध्ये माजी उपमहापौर व माजी चेअरमन प्रकाश पाटील यांनी दोन प्रवर्गात उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना दोन्हीही प्रवर्गाततून पराभूत व्हावे लागले.
एकूण 206 सभासदामधून 183 सभासदांनी मतदान केले. त्यातील 4 मतदान पत्रिका बाद झाल्या.इतर मागासवर्गीय 1 तर महीला राखीवसाठी 2 तसेच 10 खुला प्रवर्गामध्ये ही निवडणूक झाली. विजयी हिंद विकास पॅनेलचे उमेंदवार व मतदान ः अनिल हिराणी (105), प्रशांत घोडके (118), सुनील भोसले,(बिनविरोध) नितीन पाटील (116), संदीप रविंद्र सबनीस (104), दिलीप लडगे (115), जयश्री गाठ (117), सुरेश भिवटे(115), विजय रोहिडा (107), संजीव परीख (124), धनाजी साळोखे (110),ऍड. पूनम ताह्मणकर(108), डॉ. मीनल शहा (121), अनुराधा हिंदुराव पाटील.(117)
पराभूत हिंद परिवार पॅनेलचे उमेदवार ः बाळासो मनाडे (68),राजेंद्र कवठेकर (56), प्रकाश पाटील (81 व 74), डॉ. विजय मुळीक (79), अशोक पवार(60), अरुणा जाधव (56) लक्ष्मी कृष्णन (67), दीपक पाटील-किणीकर (59), बाबा जांभळे (68), किरण पाटील (58), दिलीप चौगुले. (67),
मान्यवरांनी केले मतदान
खासदार संजय मंडलिक,आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदीता माने,माजी आमदार महादेव महाडीक,श्रीमती सरोज एन. पाटील,उतम आवाडे,स्वरूप महाडीक या मान्यवर सभासदांनी मतदान केले. तर 92 वर्षीय श्रीकांत मलगोंडा पाटील यांनी गडहिंग्लज येथून येऊन मतदान केले.









