देवधर्मांबद्दलचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा
प्रतिनिधी / वास्को
हिंदू देवदेवतांबद्दल अश्लील शेरेबाजी करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्याच्या प्रकाराचा हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वास्कोत निषेध केला. मुरगाव पालिका इमारतीसमोर सुमारे शंभर कार्यकर्ते सोमवारी संध्याकाळी एकत्र आले होते. त्यांनी या ठिकाणी निदर्शने केली. देवदेवतांची निंदा नालस्ती करणे, अश्लील शेरेबाजी करणे असे प्रकार हिंदु संघटना सहन करणार नसल्याचा ईशारा यावेळी देण्यात आला.
सामाजीक माध्यमांचा वापर करून धार्मिक भावना दुखवण्याचा हा प्रकार वास्कोतील तिघां युवकांकडून हल्लीच घडला होता. या प्रकाराविरूध्द गोव्यातील विविध हिंदु संघटनांनी पोलीस तक्रार केली होती. त्यानुसार रविवारी संध्याकाळी एन्जीयो फर्नांडिस या युवकाला वास्को पोलिसांनी अटक केली आहे. त्याला तीन दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
रविवारी दुपारी या युवकाच्या अटकेच्या मागणीसाठी गोव्यातील विविध हिंदु संघटनांनी वास्को पोलीस स्थानकासमोर एकत्र येऊन पोलिसांवर दबाव आणला होता. काल सोमवारी संध्याकाळी वास्को शहरातील पालिका इमारतीसमोर पुन्हा हे कार्यकर्ते एकत्र आले व त्यांनी त्या युवकांच्या निषेधार्थ निदर्शने केली. हिंदू देवदेवतांची बदनामी, निंदानालस्ती, अश्लील शेरेबाजी करण्याचे प्रकार वाढत असून हे प्रकार यापुढे सहन केले जाणार नसल्याचा ईशारा या निदर्शनांवेळी देण्यात आला. यावेळी गोमंतक हिंदु प्रतिष्ठान, भारत माता की जय, शिवसेना, राष्ट्रीय हिंदु युवा वाहिनी, परशूराम सेना, विश्व हिंदू परिषद अशा विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शैलेंद्र वेलिंगकर, जितेश कामत, कुणाल धारगळकर, राजीव झा, किरण नाईक, तेजस पंडित, डॉ. नितीन मांजरेकर व इतर कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात हिंदु देवदेवतांवरील अश्लील शेरेबाजीचा निषेध केला व उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
दरम्यान, सध्या अटकेत असलेल्या एन्जीयो फर्नांडिस या युवकाने आपल्या सुटकेसाठी दाखल केलेला जामीन अर्ज वास्कोतील कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला आहे. ऍड. अमेय प्रभूदेसाई यांनी या संशयीत आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध करणारा युक्तवाद केला. या प्रकरणात परशूराम सेनेने संशयीत आरोपीचा सहकारी असलेल्या मडगावच्या ईशान केणी या युवकाविरूध्द पोलीस तक्रार केली आहे. धार्मिक भावना दुखवण्याच्या प्रकारात केणी याचाही तेवढाच सहभाग असून त्यालाही अटक करण्यात यावी. या प्रकरणात अन्य कोणी गुंतलेला असल्यास त्याच्याविरूध्दही कारवाई व्हावी अशी मागी परशूराम सेनेने केली आहे.
मुस्लीम संघटनांकडूनही पोलीस तक्रार दाखल, कारवाईची मागणी
सामाजीक माध्यमांवर त्या युवकाने मुस्लीम धर्मियांच्याही भावना दुखावलेल्या असून आपल्या देवधर्माचा अवमान केलेल्या त्या युवकाविरूध्द कारवाई करावी अशी मागणी वास्कोतील एकूण चार मुस्लीम संघटनांनी केली आहे. त्यांनी यासंबंधी एक निवेदन पोलिसांना सोमवारी दिले. युनायटेड मुस्लीम्स ऑफ मुरगाव तालुका यांच्यातर्फे ही तक्रार करण्यात आली आहे. नगरसेवक सैफुल्ला खान, समाजसेवक रियाज कद्री, नियाजी शेख तसेच मुस्लीम संघटनांचे अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. गोवा हा शांत प्रदेश असून गोव्यात धार्मिक सलोखा आहे. कोणत्याही देवाधर्मांविरूध्द निंदानालास्ती करण्याचा कोणालाही अधिकारी नाही. गोव्याची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न अशा प्रकारातून होत असून अशा प्रकाराविरूध्द पोलिसांनी कडक भुमिका घ्यावी. त्यामुळे भविष्यात धार्मिक भावना भडकावण्याचे धैर्य कुणी करणार नाही असे यावेळी मुस्लीम संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.









