गोव्यात 55 ठिकाणी आयोजन, नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे : प्रा. सुभाष वेलिंगकर
प्रतिनिधी /पणजी
हिंदू रक्षा महाआघाडी गोवा या संस्थेने प्रत्येक हिंदूमधील चेतना पेटवण्याचे कार्य हाती घेतले असून येत्या 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त गोव्यात 55 ठिकाणी मिरवणुका, स्वागत समारंभ आयोजित केले आहेत. भारतीय संस्कृती व परंपरेचा सन्मान करण्यासाठी नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, तसेच प्रत्येक घरावर, मंदिरावर भगवे ध्वज, पताका व गुढय़ा उभाराव्यात, असे आवाहन महाआघाडीतर्फे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.
1 जानेवारी हा आपला नववर्ष दिन नाही तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडव्यातून आपले वर्ष सुरु होते. त्या दिवशी प्रत्येक हिंदू घरावर, मंदिरावर संस्थांवर गुढी उभारण्याची प्रथा आहे. या प्रथेला नव्याने चालना देण्यात यावी, यंदाच्या वर्षी प्रत्येकाने गुढी उभारावी, असे ते म्हणाले.
दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी या महाआघाडीची पहिली बैठक झाली तेव्हा 77 संस्थांचे 155 प्रतिनिधी हजर होते. दि. 20 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या बैठकीत 1 हजार संस्था पुढे आल्या. आज या महाआघाडीत 1 हजार 107 संस्था सदस्य आहेत. त्यात मंदिर समित्या, नाटय़ समित्या, सांस्कृतिक संस्था, क्रीडा क्लब, भजनी मंडळ, स्वयंसेवी गट व इतर प्रकारच्या संस्थांचा समावेश आहे. एका वर्षात 10 हजार संस्था या महाआघाडीच्या सदस्य बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.
या महाआघाडीची पाच उद्दिष्टे आहेत. त्या सर्वप्रथम धर्मांतराला विरोध, वेगवेगळय़ा प्रकारच्या जिहादला विरोध, मंदिर सुरक्षा, धर्म शिक्षा समर्थन व हिंदू संस्कार समर्थन यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
आत्मसंरक्षण प्रशिक्षण वर्ग
दि. 30 एप्रिल व 1 मे 2022 रोजी फक्त युवतींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग वेर्णा येथे घेण्यात येईल. त्यात 250 महिलांना प्रशिक्षण देण्यात येईल. लाठी, तलवार, खडग आदी शस्त्रांचे तसेच निशस्त्र मुष्ठी युद्ध, कराटे, मार्शल आर्टचा समावेश असेल. प्रत्येक युवतीला आत्मसंरक्षण करता आले पाहिजे, असे ते म्हणाले.
तालुकावार धर्म शिक्षण
प्रत्येक तालुक्यात महा आघाडीच्या समित्या स्थापन होत असून हे काम ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण होणार आहे. या समित्या धर्म शिक्षणाचे वर्ग घेतील व आपल्या संस्कृतीपासून सध्या जी पिढी दूर चालली आहे त्यांना आपल्या धर्माचे ज्ञान आणि स्वाभिमान शिकवला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेच्यावेळी हिंदू रक्षा महाआघाडीचे सहाय्यक निमंत्रक संदीप पाळणी, सुकाणू समितीचे डॉ. सुरज काणेकर, मंदिर महासमितीचे चंद्रकांत उर्फ भाई पंडित, कार्यवाह प्रवीण नेसवणकर, सनातनच्या प्रतिनिधी शोभाताई सावंत, मातृशक्तीच्या शुभांगी गावडे, सुरेश डिचोलकर, दोडामार्ग येथील गणेश गावडे आदी पदाधिकारी हजर होते. यावेळी डॉ. काणेकर, शोभाताई सावंत, भाई पंडित आदींनी विचार मांडले. हिंदू संघटित होण्यावर त्यांनी भर दिला.









