काँग्रेसचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
हिंदूत्वाचा डांगोरा पिटणाऱया भाजप सरकारने हिंदू मंदिरांनाच लक्ष्य बनविले आहे. हिंदू मंदिरांवर चक्क प्रशासक नेमण्याचा फतवा या सरकारने काढला आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असून आम्ही त्याचा जाहीर निषेध करत असून तातडीने हा निर्णय मागे घ्यावा या संदर्भात बेळगाव जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना व धर्मादाय खात्याला निवेदन देण्यात आले.
जिह्यातील 16 मंदिरांवर प्रशासक नेमावे यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण जिह्यामध्ये खळबळ उडाली आहे. असा फतवा काढणे म्हणजे एका समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे आता मंदिरांतूनही पैसा कमवायचा उद्देश सरकारचा असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
जिह्यातील मंदिरांवर अशा प्रकारे प्रशासक नेमून तेथील रक्कम सरकारकडे जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यावरुन भाजपचे पितळ उघडले पडले असून तातडीने हा आदेश मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा देण्यात आला. धर्मादाय खात्याचे तहसीलदार जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दक्षिण मतदार संघाचे काँग्रेसचे अध्यक्ष परशराम ढगे, जयराज हलगेकर, किरण पाटील, अशोक चिंडक, प्रशांत कुलकर्णी, अमित धामणेकर, रमेश कुंडेकर, अशिष कुलकर्णी, प्रवण राठोड, देवेंद्र लोकरी, महादेव हजेरी, भोजाप्पा हजेरी, महांतेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









