क्रांती मैदान येथे सामुहिक गुढीपाडव्याचे आयोजन : वैद्यकीय, व्यवसायिक व समाजिक क्षेत्रातील मान्यवराचा गौरव
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा तालुका हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त शनिवार 2 एप्रिल रोजी भव्य गुढीपाडवा मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सोहळा क्रांती मैदान येथे होणार असून यंदा सातव्या वर्षी पदार्पण करीत आहे.
यावेळी हिंदू नववर्ष स्वागत समितीचे पदाधिकारी जयंत मिरिंगकर, साळू भगत, आनंद वाघुर्मेकर, मशाल आडपईकर, मनोज गावकर, पंकज चव्हाण उपस्थित होते. त्यानिमित्त 2 रोजी सकाळी 5.45 वा. एकत्रिकरण, 6 वा. मंगलयात्रेस प्रारंभ त्यानंतर 7 वा. गुढी पूजन व रोहण सोहळय़ानंतर नवीन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा व वाटप करण्यात येईल. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून शिक्षणतज्ञ सुभाष भास्कर वेलिंगकर राहणार आहेत. समितीतर्फे कोविड काळात वैद्यकिय क्षेत्रातील बजावलेल्या कार्याबद्दल आरोग्य अधिकारी डॉ. विजेता नाईक, व्यवसायिक क्षेत्रातील उद्योजक प्रथमेश वेरेकर व सामाजिक क्षेत्रातील पत्रकार नरेंद्र तारी यांचा गौरव करण्यात येईल. सायंकाळी 6 वा. वाळपई येथील किशोर भावे यांचे ‘गीतरामायण’ हा बहारदार कार्यक्रम होईल.
कार्यक्रमाच्या सुरळीत आयोजनासाठी निवडण्यात आलेली समिती पुढीलप्रमाणे अध्यक्ष-साळू भगत, सचिव अजय सावईकर,सहसचिव अद्वैतानंद मिरिंगकर, खजिनदार तुळशीदार पोपकर, सदस्य अमित शिरोडकर, पंकज चव्हाण, शुवांगी पैदरकर,गीता जोशी सल्लागार समितीत जयंत मिरिंगकर, आनंद वाघुर्मेकर, मशाल आडपईकर व मनोज गावकर यांचा सहभाग आहे.
गुढीपाडवा मिरवणूकीचा प्रारंभ क्रांती मैदान येथून होणार असून तिस्क फोंडा मार्गे खडपाबांध, वारखंडे, भवानी सदन चौकातून क्रांती मैदान येथे समारोप होईल अशी माहिती अध्यक्ष साळू भगत यांनी दिली. यावेळी फोंडय़ा तालुक्यातील मंदिर समिती, संस्था व हिंदुप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.









