मनपाने दखल घेण्याची गरज परिसरातील नागरिकांची तक्रार
प्रतिनिधी / बेळगाव
स्वच्छता अभियानांतर्गत शहरातील ब्लॅकस्पॉट हटविण्यात येत असताना टिळकवाडीच्या हिंदूनगर उपविभागातील छत्रपती रोड येथे नव्याने ब्लॅकस्पॉटची निर्मिती करण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांनी या कृतीचा निषेध नोंदवला असून महानगरपालिकेने त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हिंदूनगरमधील छत्रपती रोडवर श्री गणेश रिजन्सी नामक अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये सुमारे पन्नास निवासी आहेत. काही दिवसांपूर्वी अपार्टमेंटने आपला कचरा टाकण्याकरिता अपार्टमेंटसमोर रस्त्याशेजारी दोन बॅरल ठेवले आहेत. अपार्टमेंटमधील सर्व ओला व सुका कचरा वेगळा न करता या बॅरलमध्ये टाकण्यात येतो. परिणामी या रस्त्यावरून जाताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
बॅरल चोवीस तास तेथेच असल्याने परिसरातील नागरिक सर्व प्रकारचा कचरा आणून त्यामध्ये किंवा शेजारी फेकत आहेत. परिणामी या ठिकाणाला उकिरडय़ाचे स्वरुप आले असून या ब्लॅकस्पॉटमुळे गलिच्छपणाचे दर्शन होत आहे. गणेश रिजन्सीच्या रहिवाशांनी आपला कचरा आपल्या हद्दीत ठेवून सकाळी तो महानगरपालिकेला हस्तांतरित करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. भटकी कुत्री खाद्य शोधण्यासाठी हे बॅरल आडवे करतात व कचरा सर्वत्र पसरतो, याचा त्रास नागरिकांना होत आहे. ही स्थिती निर्माण करणाऱयांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. महानगरपालिकेने अपार्टमेंटच्या खर्चाने परिसर स्वच्छ करावा. यापुढे तिथे कुणीही कचरा टाकणार नाही याची दखल घ्यावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.









