सिंगापूरमध्ये कारवाई : घातपाताचा होता कट
सिंगापूर : सिंगापूरमधील हिंदूंच्या विरोधात हल्ले करण्याचा कट रचणाऱया तसेच काश्मीरमध्ये घातपात घडवून आणू पाहणाऱया बांगलादेशी दहशतवाद्याला अटक केल्याची माहिती तेथील प्रशासनाने दिली आहे. फ्रान्समध्ये हल्ल्यानंतर सुरक्षा उपायांच्या अंतर्गत 37 संशयितांची चौकशी करण्यात आली, ज्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सिंगापूरच्या गृह मंत्रालयाने सांगितले आहे.
या 26 वर्षीय बांगलादेशी दहशतवाद्याचे फैसल असे नाव आहे. दहशतवादाशी संबंधित कारवायांच्या चौकशीनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
चौकशी करण्यात आलेल्या 37 संशयितांपैकी 14 जण सिंगापूरचे नागरिक तर 23 विदेशी आहेत. विदेशींमध्ये बांगलादेशींचे प्रमाण अधिक आहे. फैसलने चाकू खरेदी केला होता. हिंदूंवर या चाकूने हल्ला करण्यासह काश्मीरमध्ये घातपात घडविण्याची योजना होती असे त्याने चौकशीत सांगितले आहे. फैसल धार्मिक कट्टरवादी असल्याचे तपासात आढळून आले आहे.
2017 पासून फैसल सिंगापूरमध्ये बांधकाम मजूर म्हणून कार्यरत आहे. 2018 मध्ये इस्लामिक स्टेटच्या ऑनलाईन दुष्प्रचारामुळे तो कट्टरवादी झाला. सीरियात इस्लामिक स्टेटच्या वतीने लढण्यासाठी तो जाऊ पाहत होता. सीरियातील तहरीर अल शाम या दहशतवादी संघटनेला त्याने देणगीही दिली हाती. इस्लामिक स्टेट आणि एचटीएससोबत फैसलने अल कायदा, अल शबाब यासारख्या दहशतवादी संघटनांनीही ऑनलाईन समर्थन व्यक्त केले आहे.