बेंगळूर/प्रतिनिधी
भाजप हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राच्या नावाने तरुणांची दिशाभूल करत असल्याचा आरोप जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांनी केलाय. तसेच भाजपाने तरुणांची दिशाभूल करण्याऐवजी नोकऱ्या निर्माण करण्यावर आणि त्यांना रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करावं असंही कुमारस्वामींनी म्हटलंय. जेडीएस (JDS) कर्नाटकातील २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत (assembly election) पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी युवाशक्तीचा वापर करण्यावर भर देईल. तसेच राज्यात १२३ जागा जिंकण्याचं आपलं लक्ष्य असून महिलांचं संघटन मजबूत कारणार असल्याचं एच. डी. कुमारस्वामी म्हणाले.
“केंद्रातील भाजप (BJP) सरकारने सत्तेत येण्याआधी २ कोटी नोकऱ्या (JOB) देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु रोजगार देण्याऐवजी त्यांनी बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण केले आहे. १४ महिन्यांच्या काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारने नऊ जिल्ह्यांमध्ये औद्योगिक क्लस्टर्स उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याकडे भाजपने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे,” तसेच करोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून सरकारी नोकरभरती देखील बंद असल्याचं ते म्हणाले. भाजप हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्यावर भर देऊन प्रसिद्धी मिळवत आहे. ते हिंदुत्वाच्या नावाने देशातील तरुणांची भावनिकपणे दिशाभूल करत आहेत. आज देश आणि राज्यातील तरुणांना रोजगाराची गरज आहे. जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबाला आधार देऊ शकतील”, असंही त्यांनी म्हटलंय.
यावेळी कुमारस्वामी यांनी कार्यकर्त्यांना चला बेरोजगारी मिटवण्यावर आणि आपल्या युवकांना रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करूया. आधी आपले आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचे आयुष्य घडवण्याकडे लक्ष द्या आणि नंतर हिंदुत्व किंवा हिंदु राष्ट्राचा विचार करा. हिंदुत्वाच्या नावावरून तरुणांची दिशाभूल करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवर मात करण्यासाठी काम करा. राज्यातील लोकांसाठी चांगलं सरकार आणण्यासाठी तरुण आणि महिला शक्ती एकत्र करण्यावर भर देऊया, असं कुमारस्वामी जेडीएसच्या कार्यकर्त्यांना म्हणाले.