प्रतिनिधी / सातारा :
राजवाडा बसस्थानकाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या भेटीच्या शिल्पाचे लोकार्पण सोमवारी सायंकाळी सुरु असताना अचानक सातारा पोलीस आले अन् हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना अटकाव केला. कार्यकर्त्यानी वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या तरीही पोलिसांनी सर्व हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना पोलीस गाडीत घालून पोलीस ठाण्यात नेले. ही सातारा पोलिसांची दडपशाही आहे, असा आरोप हिंदूत्ववादी मिलिंद एकबोटे यांनी यावेळी केला आहे.
नगरसेवक विजय काटवटे यांच्या प्रयत्नातून राजवाडा बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या भेटीचे शिल्प साकारण्यात आले आहे. या शिल्पाचा लोकार्पण सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या शिल्पाला काही संघटनांनी विरोध करत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी लोकापर्ण करतेवेळी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना रोखण्यात आले. मिलिंद एकबोटे, शहाजीबुवा रामदासी, नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह कार्यकर्त्यांना शिल्पाचे लोकार्पण करताना विरोध केला. त्यावेळी पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध वंदे मातरम म्हणत व छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष केला. पोलिसांनी त्यांना पोलीस गाडीत बसवून शाहुपूरी पोलीस ठाण्यात नेले.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मिलिंद एकबोटे यांनी सातारा पोलिसांच्या या कृत्याचा कडाकडून निषेध नोंदवला. ज्या शिवसमर्थ भूमीत शिवसमर्थ भेटीच्या शिल्पाला विरोध करणे म्हणजे हिंदूत्वावर मोठा प्रहार आहे. सातारा पोलिसांची ही दडपशाही योग्य नाहे. त्यांनी इतिहास तपासावा मग विरोध करावा. ज्यांनी तक्रार केली त्यांचा इतिहास अर्धवट आहे. त्यांना पुन्हा इतिहास शिकवण्याची गरज आहे, अशी टीका त्यांनी केली.









