प्रतिनिधी /बेळगाव
हिंदवाडी येथे काही महिन्यांपूर्वी जलवाहिनी घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. रस्त्यामधूनच खोदाई करण्यात आल्याने सध्या हा रस्ता धोकादायक बनला आहे. अनेक दिवस उलटले तरी अद्याप हा रस्ता करण्यात आलेला नाही. चरीमध्ये असणाऱया मातीमुळे वाहने सरकली जात असून अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी रहिवासी करीत आहेत.
गोमटेश विद्यापीठापासून येळ्ळूर बसस्टॉपपर्यंत जलवाहिनी घालण्यासाठी चर मारण्यात आली होती. चरीमध्ये माती घालून ती बुजविण्यात आली होती. अनेक दिवस उलटले तरी त्या भागाचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. चरीमध्ये भरलेल्या मातीमुळे वाहने सरकली जात आहेत. उतारावरून जोराने येणारी वाहने या चरीमधील मातीमुळे घसरत आहेत. यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.