प्रतिनिधी / बेळगाव
हिंडाल्को मॅरेज हॉलजवळ गांजा विकणाऱया दोन तरुणांना काकती पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्यांच्या जवळून 800
ग्रॅम गांजा व एक डिओ दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
हिंडाल्कोजवळील मॅरेज हॉलनजीक गांजा विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर, उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून दोघा जणांना अटक केली. त्यांच्या जवळून एक दुचाकी व 800 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
शुभम हणमंत बाळेकुंद्रीकर (वय 19), किर्तीकुमार सुरेश भेकणे (वय 19, दोघेही रा. कंग्राळी बी. के.) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.









