कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्णय : 23 मेपर्यंत अंमलबजावणी होणार
वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत रविवार दि. 16 ते रविवार दि. 23 मेपर्यंत संपूर्ण गावामध्ये कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यानुसार रविवारपासून गावातील मेडिकल व दूधविक्री वगळता इतर सर्व किराणा दुकाने, हॉटेल व दैनंदिन व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत.
गेल्या महिन्याभरात हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रामध्ये शंभरहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर काही रुग्णांचा मृत्यूदेखील झाला आहे. याशिवाय गावातील व उपनगरांतील बहुतांश रुग्ण हे आपला आजार लपवून खासगी दवाखान्यांमध्ये उपचार करून घेत गावामध्ये फिरत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनाही याचा मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण झाला आहे.
परिसरात दररोज 15 ते 20 नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी गावामध्ये संपूर्णतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठोस चर्चा करण्यासाठी आज महत्त्वाची बैठक
ग्राम पंचायतीमार्फत गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी करून परिसर निर्जंतूक करण्याबरोबरच नागरिकांच्या घरोघरी जाऊन कोरोना नियमांचे पालन करून आपले व इतरांचेही संरक्षण करण्याची सूचना करण्यात आली आहे. शिवाय काही ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोनदेखील निर्माण करत परिसर यापूर्वीच सीलडाऊन करण्यात आला
आहे.
तरीदेखील दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच असल्याने आठ दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत ठोस चर्चा करण्यासाठी शनिवार दि. 15 रोजी गावामध्ये महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे.
ग्रामस्थांनी बंद पाळून सहकार्य करण्याचे आवाहन
हिंडलगा परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. गावासह कार्यक्षेत्रातील गोकुळनगर, श्रीनाथनगर, विजयनगर, लक्ष्मीनगर, कलमेश्वरनगर आदी भागामध्ये रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. तेव्हा रविवारपासून आठ दिवस होणाऱया लॉकडाऊन काळात नागरिकांनी आपले सर्व दैनंदिन व्यवहार व दुकाने बंद ठेऊन सहकार्य करावे. तसेच शनिवारीच आठवडाभरासाठी लागणारे रेशन व घरगुती साहित्य खरेदी करून ठेवावे, असे आवाहन ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी केले आहे.
– नागेश मन्नोळकर ( ग्रा. पं. अध्यक्ष, हिंडलगा)