साईराज चषक ग्रामीण क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक ग्रामीण टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात श्रीगणेश कणबर्गी संघाने पीजी वॉरियर्स बाळेकुंद्री संघाचा, अयोध्या कडोलीने चव्हाटा स्पोर्ट्स कुदेमनी संघाचा, जगदंबा हंगरगा संघाने मराठा स्पोर्ट्सचा तर इंडियन बॉईज हिंडलगाने एसएस स्पोर्ट्स मुचंडीचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. शंकर होसमनी, विजय चलवटकर, अजय भोसले, संतोष सुळगे पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात पीजी वॉरियर्स बाळेकुंद्रीने 10 षटकात सर्व बाद 62 धावा केल्या. राकेशने 18 तर जुनेदने 11 धावा केल्या. श्रीगणेश कणबर्गीतर्फे सागरने 4 तर संतोष सुळगे पाटीलने 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना श्रीगणेश कणबर्गी संघाने 4.1 षटकात बिनबाद 63 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. संतोष सुळगे पाटीलने 3 षटकार 6 चौकारासह नाबाद 50 धावा केल्या. दुसऱया सामन्यात चव्हाटा स्पोर्ट्स कुदेमनी संघाने 10 षटकात 5 बाद 75 धावा केल्या. शंकरने 29, चाळोबाने 28 तर परशरामने 12 धावा केल्या. कडोलीतर्फे विनायकने 3 तर आकाशने 1 गडी बाद केला. त्याला उत्तर देताना अयोध्या कडोलीने 8.2 षटकात 3 बाद 81 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. अजय भोसलेने 36, गजाननने 18, आकाश कटांबळेने नाबाद 14 धावा
केल्या.
तिसऱया सामन्यात मराठा स्पोर्ट्स मण्णूर संघाने 10 षटकात 9 बाद 73 धावा केल्या. राजूने 18, अनिलने 13 धावा केल्या. हंगरगातर्फे विजय, यल्लाप्पा, बलराम, ओंकार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना जगदंबा हंगरगा संघाने 9.3 षटकात 5 बाद 75 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. कल्लाप्पाने नाबाद 31 तर ओंकारने 17 धावा केल्या. चौथ्या सामन्यात एसएस स्पोर्ट्स मुचंडीने 10 षटकात 6 बाद 54 धावा केल्या. विजयने 16 तर आकाश आणि श्रीकांत यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. हिंडलगातर्फे शंकरने 3 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना इंडियन बॉईज हिंडलगाने 5.1 षटकात 1 बाद 58 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. प्रतिकने 32, तर सुशांतने 24 धावा केल्या. मंगळवारी उपांत्य फेरीचे सामने-1) इंडियन बॉईज हिंडलगा वि. जगदंबा हंगरगा, 2) अयोध्या कडोली वि. श्रीगणेश कणबर्गी.









