कंग्राळी बुदुक : ‘हुतात्मे अमर रहे’, ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत सीमाप्रश्नी आणि कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हिंडलगा हुतात्मा स्मारक स्थळावर दीपोत्सव पार पडला. कंग्राळी बुद्रुक येथील तालुका म. ए. समिती युवा आघाडाने हा उपक्रम राबविला.
सीमाप्रश्नी आणि कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांची आठवण कायम राहावी, या उद्देशाने हिंडलगा येथे हुतात्मा स्मारक उभारले आहे. दरवषी 1 जून रोजी हुतात्मा दिन पाळण्यात येतो. येथे हुतात्मा भवन उभारण्यासाठी तालुका म. ए. समितीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. दिवाळीच्या अनुषंगाने हुतात्म्यांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी, त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी कंग्राळी बुद्रुक येथील युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मारक ठिकाणी दीपोत्सव केला. मयूर बसरीकट्टी यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री स्मारक ठिकाणी दीप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी हुतात्मा परिसर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला होता. यावेळी सुशील रेडेकर, आनंद चिखलकर, ग्रा.पं. सदस्य नवनाथ पुजारी, कल्लाप्पा पाटील, सचिन पाटील, विनायक कडोलकर, मदन पवार, दीपक पाटील, चेतन हुरुडे, प्रशांत जाधव, कल्लाप्पा कडोलकर, मंथन चिखलकर, अजय यळ्ळूरकर, भूषण चिखलकर, आदेश यल्लाळ, रोशन चिखलकर, संदेश बांदिवडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.









