गळफास घेऊन संपविले जीवन, चिठ्ठीमुळे प्रकरणाला कलाटणी
प्रतिनिधी/ बेळगाव
गणेशनगर, हिंडलगा येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नेहरुनगर-मच्छे येथे घडली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीला जबाबदार कोण? याचा उल्लेख त्याने चिठ्ठीत केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी दोघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सावियो विन्संट पिल्लई (वय 28, मूळचा रा. गणेशनगर, हिंडलगा, सध्या रा. मच्छे) असे त्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही घटना उघडकीस आली आहे. शनिवारी बेळगाव ग्रामीणचे एसीपी गिरीश, पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सावियोने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.
शनिवारी रात्रीपर्यंत पोलीस अधिकाऱयांकडून यासंबंधी कसलीच अधिकृत माहिती दिली गेली नाही. हे प्रकरण दडपण्यासाठी ग्रामीण पोलिसांची धडपड सुरू होती. सावियोने लिहिलेल्या चिठ्ठीत पोलिसांचाही उल्लेख आल्यामुळे पोलीस माहिती लपवून ठेवण्यात धन्यता मानत होते. बेळगावात अशी अनेक प्रकरणे दडपण्यात येत आहेत.
सावियोने लिहिलेल्या चिठ्ठीत पृथ्वीसिंग, रेणूका व काही पोलिसांचा उल्लेख केला आहे. आपल्याकडून दीड लाख रुपये उकळण्यात आले आहेत. आणखी पैशासाठी मागणी केली जात होती. पैसे दिले नाहीत तर जेलला टाकू, असे धमकविण्यात आले आहे. त्यामुळेच आपण आत्महत्या करीत आहोत. आपण तर जीवन संपवित आहोत. आपल्यानंतर आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचे काय? असा सवालही या तरुणाने उपस्थित केला आहे.
ग्रामीण पोलीस संशयाच्या भोवऱयात
बेळगाव ग्रामीणचे एसीपी गिरीश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. सावियोने लिहिलेली चिठ्ठी आपल्याला सापडली नाही, असेही त्यांनी सांगितले. जेणेकरून चिठ्ठीतील मजकूर लपविण्याचा प्रयत्न अधिकाऱयांनी केला आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून माहिती लपविणारे ग्रामीण पोलीस संशयाच्या भोवऱयात अडकले आहेत.









