प्रतिनिधी/ बेळगाव
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच गट बांधणीला जोर वाढला आहे. हिंडलगा गावातील ग्रामस्थांची बैठक आयोजित करून ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी ग्राम विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. तसेच माजी ग्रामपंचायत सदस्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करून येत्या निवडणुकीत त्यांना संधी देण्यात येवू नये, अशी जोरदार मागणी यावेळी युवा कार्यकर्त्यांनी केली.
ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याबाबत चर्चा करण्यासाठी हिंडलगा गावातील ग्रामस्थांची बैठक रविवारी पार पडली. याप्रसंगी राजू कुपेकर यांनी बैठकीच्या आयोजनाचा उद्देश सांगून प्रास्ताविक केले. यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. मागील सभागृह अस्तित्वात आल्यानंतर सदस्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने गावच्या विकासात खंड पडला आहे. खुर्चीसाठी सदस्यांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे गावचा विकास खुंटला आहे. मागच्या सभागृहातील सदस्यांनी कोणतीच विकासकामे राबविली नाहीत. असा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच मागील 5 वर्षांत कोणती विकासकामे राबविली याचा जाब माजी सदस्यांना विचारा, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यामुळे यावेळी बैठकीत गोंधळ माजला. माजी सदस्य उपस्थित नसताना जाब कसा विचारणार, असा मुद्दा रमाकांत पावशे यांनी उपस्थित केला.
युवा कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे
निवड कमिटीची स्थापना करण्यात येते. पण निवड कमिटीच्या सूचनेनुसार सदस्य कामकाज करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर बंधने घालण्याची गरज आहे. मर्जीनुसार वागत असल्याने गावातील विकासकामे रखडली असल्याचा आरोप चंद्रकांत अगसगेकर यांनी केला. तसेच आगामी निवडणुकीत माजी सदस्यांना निवडणूक लढविण्यास संधी देण्यात येवू नये, अशी जोरदार मागणी युवा कार्यकर्त्यांनी केली. येत्या निवडणुकीत युवा कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात यावे, असा ठराव बैठकीत करण्यात आला.
निवडणूक लढविण्यास योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी निवड कमिटीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. कृष्णा फकिरा पावशे यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम विकास आघाडीची स्थापना बैठकीत करण्यात आली. निवड कमिटीसाठी प्रत्येक वॉर्डमधून पाच सदस्यांची नावे देण्यात यावीत, असे आवाहन करण्यात आले. तसेच गावच्या सर्वांगिन विकासासाठी आणि ग्राम पंचायतीवर ग्रामस्थांचा वचक ठेवण्यासाठी एकीने ग्रा. पं. निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. गावच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱया सदस्यांची निवड करण्यासाठी आगामी निवडणुकीत योग्य उमेदवार देण्यात यावेत, अशा विविध सूचना नागरिकांनी केल्या. यावेळी ग्रामस्थांसह युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठय़ा प्रमाणात होती.









