बेळगाव पोलिसांकडून तपासणी मोहीम : मोबाईलसंदर्भात चौकशी सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी बेळगाव पोलिसांनी तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत एका बराकीबाहेर मोबाईल संच आढळला असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. हा मोबाईल कोणाचा याचा शोध घेण्यात येत आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 यावेळेत पोलिसांनी संपूर्ण कारागृह पिंजून काढले. या कारवाईत दोन एसीपी, 8 पोलीस निरीक्षक, 8 उपनिरीक्षक व 55 पोलिसांनी भाग घेतला होता.
शोध मोहिमेसाठी महिला पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी प्रत्येक बराकीत तपासणी केली. कारागृहात सापडलेला मोबाईल कोणाचा? त्या मोबाईलवरुन कोणाशी संपर्क साधण्यात आला आहे, याची चौकशी करण्यात येत आहे. खून प्रकरणात सध्या अटकेत असलेल्या एका आरोपीने पैशासाठी महिलेला धमकविल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्या पाठोपाठ बेळगाव पोलिसांनी कारागृहात तपासणीची मोहीम राबविली आहे.