ऑनलाईन टीम / मुंबई :
हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी आज पहाटे आरोपी नगराळे याला कोर्टात हजर केले. तेव्हा पोलिसांनी त्याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. आवश्यकतेनुसार त्याला पुन्हा पोलीस कोठडीत रवाना करण्याची परवानगीही न्यायालयाकडे मागण्यात आली. घटनेच्या प्रत्यक्षदर्शींकडून लवकरात लवकर आरोपीची ओळख परेड घेऊन या प्रकरणाला गती देण्यासाठी पोलिसांनी त्याची न्यायालयीन कोठडी मागितल्याचे समजते.
हा खटला लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी तो जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. उज्ज्वल निकम बाजू मांडणार आहेत. या खटल्याचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे.
हिंगणघाट येथील प्राध्यापक तरुणीला एकतर्फी प्रेमातून विकी नगराळे या तरुणाने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये तरुणी मोठय़ा प्रमाणात भाजली गेली. तिची वाचा गेली आहे. डोळेही जाण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असून, ऑरेंज सिटी रुग्णालयात तिचावर उपचार सुरू आहेत.









