मोरजी/प्रतिनिधी
गोव्याचे सुपुत्र तथा भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्ते माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांना मिळालेले राज्यपालपद हा सच्या गोमंतकीयाचा सन्मान आहे .गोव्यासाठी भूषण आहे .त्यांच्या हातून हिमालयाइतके कौतुकास्पद कार्य घडो असे मांदे मतदार संघाचे आमदार तथा पर्यटन महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी सांगितले .
माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून निवड झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार श्री.सोपटे बोलत होते. ते पुढे म्हणाले दोन वेळा आमदार झालेल्या आदरणीय श्रीमान आर्लेकर सरांनी सर्वसामान्य भाजप कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार,सभापती ,मंत्री अशी विविध पदे भूषवली आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना आपल्यावरही अनेक राजकीय संस्कार झाले त्यांच्यामुळेच आज आपण राजकारणात सक्षम पणे कार्यरत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.पेडण्याचे नेतृत्व करताना या पेडण्याच्या विकासाला गती देण्याचे कार्य त्यांनी प्रामाणिक पणे केले आहे . पक्ष कार्याला वाहून घेतलेले आर्लेकर एक समर्पित व्यक्तिमत्व आहे.त्यांच्या प्रामाणिक कार्याची पोचपावती म्हणून घटनेतील सर्वोच आणि प्रतिष्ठित असे पद त्यांना आज प्राप्त झाले आहे.त्या पदाला ते निश्चितच प्रतिष्ठा प्राप्त करून देतील यात शंका नाही. गोव्यासारख्या एका चिमुकल्या राज्यातून एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची उत्तुंग असलेल्या हिमालयाच्या राज्यपाल पदी निवड होणे ही सामान्य गोष्ट नाही. सर्वसामान्य व्यक्तीच्या असामान्य कर्तुत्वाचा हा सन्मान आहे. प्रत्येक गोमंतकीयाचा अभिमान आहे. असे त्यांनी सांगितले.









