रस्त्यांवर पडलेले ध्वज घरात सन्मानासह ठेवतो हा व्यक्ती
स्वातंत्र्य दिन असो किंवा प्रजासत्ताक दिन, सोहळय़ानंतर प्लास्टिकचे हजारो झेंडे इकडेतिकडे पडलेले दिसून येतात. काही झेंडे कचरापेटी, नाल्यांमध्ये विखुरून पडल्याचे दिसून येते. स्वतःकडून होत असलेल्या राष्ट्रीय प्रतिकाच्या अवमानाची कित्येक जणांना जाणीवसुद्धा नसते. पण कोलकात्यातील एक व्यक्ती या झेंडय़ांना रस्त्यांवरून उचलून सन्मानासोबत स्वतःच्या घरात जपून ठेवतो. तो दीर्घकाळापासून राष्ट्रीय सणांनंतर रस्त्यावर बाहेर पडून तेथे पडलेले झेंडे जमा करतो.
बाली, हावडा येथील रहिवासी असणाऱया प्रिययंजन सरकार यांनी आतापर्यंत एक लाखांहून अधिक झेंडे जमा केले आहेत. राष्ट्र प्रतिकाचा सन्मान करण्यासाठी हे झेंडे रस्त्यांवरून उचलत असल्याचे ते सांगतात. एक दिवस सरकार रस्त्यांवर झेंडे टाकणाऱया व्यक्तींच्या विरोधात कठोर नियम तयार करेल अशी अपेक्षा त्यांनी आहे.

‘प्रियो रंजन’ यांना ‘हावडय़ाचा फ्लॅगमॅन’ म्हटले जाते. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन तसच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी (23 जानेवारी) त्यांचे काम खूपच वाढते. कारण सोहळय़ानंतर हजारो झेंड शहरात पडलेले आढळून येतात. आमचा ध्वजच आमची ओळख असल्याचे त्यांची आजी आणि आई सांगायची. यातूनच या कामाची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रंजन यांच्या आईकडूनच त्यांना रस्त्यांवरील झेंडे जमा करण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्या देखील हे काम करत होत्या. सध्या रंजन यांचे घर राष्ट्रीय ध्वजासाठी संग्रहालयासारखे आहे. या घराला हावडा तसेच अन्य ठिकाणाहून लोक भेट देत असतात आणि त्यांच्या उत्तम संग्रहाचे कौतुक करतात. रंजन दरवर्षी स्वातंत्र्यदिनी स्वतःच्या घरात ध्वजारोहण करतात आणि त्यांच्या प्रतिष्ठेच्या रक्षणाचा संकल्प घेतात.









