वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक असल्याने सर्वच पक्ष राज्यातील बहुसंख्याक पाटीदार समाजाला स्वतःच्या बाजूने वळविण्याची तयारी करत आहेत. याचदरम्यान आम आदमी पक्ष पाटीदारांना आकर्षित करण्यासाठी हार्दिक पटेलला स्वतःचा चेहरा करण्याच्या तयारीत आहे. पाटीदार आरक्षण आंदोलनाचा युवा आणि आक्रमक नेता म्हणून ओळखला जाणार हार्दिक सध्या गुजरात काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष आहे. पण पालिका निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडण्यामागे हार्दिकच कारणीभूत असल्याचे अनेक काँग्रेस नेत्यांचे मानणे आहे. सूरत महापालिकेत आप आदमी पक्षाला पाटीदार समुदायाच्या पाठिंब्यामुळेच 27 जागा मिळाल्याचे मानण्यात येते. पाटीदार नेता हार्दिकला नेतृत्व देत भाजप आणि काँग्रेसची कोंडी करण्याचा विचार आपने चालविला आहे









