नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी करून याबाबत माहिती दिली. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी केंद्र सरकारने शनिवारी यासंबंधी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 46 वषीय तल्हा सईद हा लष्कर-ए-तोयबाने भारतात केलेल्या हल्ल्यांचे नियोजन, निधी आणि भरतीमध्ये सामील असल्याचे स्पष्टीकरण गृह मंत्रालयाने दिले आहे. यासोबतच तो पाकिस्तानमधील एलईटीच्या विविध केंद्रांनाही भेट देत असल्याचे स्पष्ट केले. भारतापाठोपाठ आता संयुक्त राष्ट्रसंघाचे इंटरपोलही तल्हावर धडक कारवाई करू शकते, असे मानले जात आहे.
तल्हा सईद हा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असतो. त्यामुळे त्याला ‘युएपीए’ कायदा, 1967 अंतर्गत दहशतवादी घोषित केले जात असल्याचे केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. तल्हा हा एलईटीच्या मौलवी शाखेचा प्रमुख आणि लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा प्रमुख दहशतवादी आहे. पाश्चात्य देश आणि अफगाणिस्तानमध्ये भारताच्या हिताच्या विरोधात जिहाद पसरवण्यात त्याचा सहभाग असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. त्याचवेळी भारत इस्रायल, अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांमध्ये भारतीय हितांविरुद्ध जिहाद पुकारण्याचे आवाहन करणारी विधाने करत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 26/11 च्या मुंबई हल्ल्यात हाफिजच्या मुलाचीही महत्त्वाची भूमिका होती. पाकिस्तानात हाफिज सईदच्या घराजवळ झालेल्या स्फोटानंतर तल्हा सईद शेवटचा सार्वजनिकरित्या दिसला होता. स्फोटात जखमी झालेल्यांना भेटण्यासाठी तो रुग्णालयातही पोहोचला होता.









