मुंबई / ऑनलाईन टीम
देशासह महारष्ट्रात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राक कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळून येत आहेत. अशावेळी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट देत पाहणी केली. त्यावेळी कोरोना लसीच्या निर्मितीबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी महत्वाची माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मागील दोन दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना लसीबाबत विषय मांडला होता. हाफकिन ही देशाला पोलिओ मुक्त करणारी संस्था आहे. तिची कल्पना पंतप्रधानांना दिली आहे. या संस्थेला पुन्हा ताकद देण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
लस बनवणाऱ्या इतर ज्या कंपन्या आहेत. त्यांच्याशी बोलणी सुरु आहे. तसंच राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेत सातत्याने संशोधन सुरु राहील, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोरोना लसीबाबत राजकारण करायचे नाही. केंद्र सरकारने सांगितले आहे की, तुम्हाला मागणीनुसार पुरवठा केला जाईल. त्यांनी वर्गवारी करुन दिलेली आहे. पण या संकटातून लवकर बाहेर पडण्यासाठी लसींचा पुरवठा वाढवावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.