ऑस्ट्रेलियातील वणव्यांमुळे प्रचंड हानी : मोठय़ा प्रमाणावर जंगल नष्ट, शेकडो प्रजाती विलुप्त
वृत्तसंस्था/ कॅनबरा
ऑस्ट्रेलियातील वणव्यांमुळे नष्ट झालेल्या जंगलांना जुने स्वरुप पुन्हा प्राप्त होण्यासाठी किमान 100 वर्षांचा कालावधी लागणार आहे. जंगलांमध्ये लागलेली आग कित्येक महिन्यांनी शांत झाली असून यात पावसाने मोठा हातभार लावला आहे. या आगीने ऑस्ट्रेलियातील जंगलातील सुमारे 1 अब्ज जीवजंतू नष्ट केले आहेत. अनेक प्राण्यांच्या प्रजाती लुप्त झाल्याने त्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे.
या वणव्याने अब्जावधी रुपयांची मालमत्ताही स्वाहा केली आहे. आगीने 29 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तेथील जंगलांमध्ये निर्माण केलेली आलिशान घरे जळून खाक झाली आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी ऑस्ट्रेलियाला शतकाचा कालावधी लागणार असल्याचे तज्ञांचे मानणे आहे. जंगलांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी आग लागली होती. पाऊस आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. वणव्याने कोआलाच्या एक तृतीयांश संख्येचा जीव घेतल्याचा अनुमान आहे. 20 दशलक्ष एकराहून अधिक आकाराचे जंगल नष्ट झाले आहे.
तीन प्रजाती संकटात
ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये तीन प्रजाती लुप्तप्राय झाल्या आहेत. यात बेडूक, रीजेंट हनिटर पक्षी आणि एका विशिष्ट पोपटाचा समावेश आहे. नष्ट झालेले मोठय़ा आकारातील जंगल पुन्हा निर्माण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने 50 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स खर्च करण्याची घोषणा केली आहे. आगीपासून बचावासाठी जगातील सर्वात मोठी अग्निशमन सेवा (74 हजार कर्मचारी) कार्यरत आहे.
मदतनिधी घोषित
पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बुश फायर रिकव्हरी फंडमध्ये 200 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे. या निधीतून आगीमुळे नष्ट झालेली घरे तसेच पायाभूत सुविधा पुढील दोन वर्षांमध्ये पुन्हा उभारली जाणार आहे. दोनशे कोटी डॉलर्सची ही रक्कम यापूर्वी मंजूर निधीच्या व्यतिरिक्त असणार आहे. तसेच भविष्यात यात वाढ केली जाऊ शकते, असे मॉरिसन यांनी म्हटले आहे.









