लॉकडाऊन सुरू झाल्यापासून घराच्या सांदीकोपऱयांमधून हुडकून हुडकून घरातील सगळी पुस्तकं वाचून काढली. आता उरलेल्या वेळात नाईलाजाने टीव्ही बघतो आहे. अधेमधे सोशल मीडियावर फेरफटका मारतो आहे. टीव्हीवर अचानक जुने हिंदी चित्रपट लागतात तेव्हा जुने दिवस आठवतात आणि लगेच सोशल मीडियावरची भांडणेदेखील आठवतात. चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी दिलीपकुमारचा ‘देवदास’ सिनेमा पाहिला होता. सिनेमा सुटल्यावर चहा घेताना दोन मित्रांचा आपापसात वाद झाला की देवदासची भूमिका दिलीपकुमारऐवजी कोणी चांगली केली असती. एकजण सुनील दत्तचा चाहता नि दुसरा राजकुमारचा. दोघे आपापल्या नटाची बाजू घेऊन तावातावाने भांडले होते. एकमेकांना शिवीगाळ केली होती. अनेक महिने अबोला धरला होता. आता सोशल मीडियावर वेगवेगळे मित्र आपापल्या लाडक्मया नेत्यांसाठी असेच भांडताना बघून गंमत वाटते.
हे जुने सिनेमे बघताना आणखीन एक गंमत होत असते. नायक किंवा खलनायक धूम्रपान-मद्यपान करीत असताना खाली ओळ येते की धूम्रपान आणि मद्यपान आरोग्याला हानिकारक आहे. त्याच चालीवर सिनेमात गर्दीची दृश्ये येतात किंवा नायिकेशी खलनायक बळजबरीने आणि नायक राजीखुशीने सलगी करतो तेव्हा कोरोनाबद्दलची अंतर राखण्याची सूचना दाखवायला हरकत नाही. मराठीतल्या कौटुंबिक मालिका बघताना तिसरीच मौज. तिथे नायक-नायिका जणू काय कोरोनाग्रस्त भागातून आल्यासारखे वाटतात. कधीच सलगी करीत नाहीत. शहाण्या मुलांसारखे अंतर ठेवून वागतात. प्रेमाचे संवाददेखील लांबून बोलतात. पण याच मालिकांमध्ये पुरुष पात्रे एकमेकांना आणि स्त्री पात्रे एकमेकांना आवर्जून मिठय़ा मारतात, खांद्यावर हात ठेवतात. अशा वेळी कोरोनाबद्दलची सूचना पडद्यावर दाखवली पाहिजे.
या कौटुंबिक मालिकांची आणखीन एक गंमत सांगायलाच हवी. प्रत्येक मालिकेत एक तरी विवाहबाह्य प्रकरण असते. असू देत. आमचं काही म्हणणं नाही. पण काही वेळा मालिकेत तो आणि ती रीतसर लग्न करतात आणि मग त्यांच्या मीलनात मालिका संपेतो अडथळे येत राहतात. मीलन शिंचं होतच नाही. आपण वर्तमानपत्रात लग्नाचं आमिष दाखवून गैरफायदा घेणाऱयांच्या तक्रारी आणि खटल्यांच्या बातम्या वाचतो. मालिकांमध्ये मात्र मीलनाचं आमिष दाखवून लग्ने होतात पण तक्रार कोणीच करीत नाही–मालिकेतली बिचारी पात्रे किंवा अगदी प्रेक्षक देखील!








