जागतिक वन्यजीव दिनाचे निमित्त साधले
बाहुबली फेम दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार राणा दग्गुबाती याच आगामी चित्रपट ‘हाथी मेरे साथी’चा ट्रेलर बुधवारी जागतिक वन्यजीव दिनी प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीमने चेन्नई आणि हैदराबादमध्ये ट्रेलर प्रदर्शित केल आहे. 4 मार्च रोजी चित्रपटातील सर्व कलाकार एक ऑनलाईन पत्रकार परिषद घेणार आहेत. एरोस इंटरनॅशनलकडून निर्मित ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू सोलोमन यांनी केले आहे.
3 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये वन अतिक्रमण आणि क्रोनी कॅपिटलिज्म यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्दय़ांना स्पर्श करण्यात आल्याचे दिसून येते. या चित्रपटात राणा दग्गुबाती वनदेवतेची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत निर्माण करण्यात आला आहे. हिंदीत ‘हाथी मेरे साथी’, तमिळमध्ये ‘कादान’, तर तेलगूत ‘अरन्या’ या नावाने हा चित्रपट 26 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाची कथा हत्तींच्या सुरक्षेवर आधारित आहे. राणा दग्गुबातीसह विष्णू विशाल, पुलकित सम्राट, श्रिया पिळगावकर, जोया हुसैन इत्यादी कलाकार यात दिसून येतील. 1971 मध्ये ‘हाथी मेरे साथी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. राजेश खन्ना यांच्या या चित्रपटाला प्रचंड पसंती मिळाली होती.









