ऑनलाईन टीम / लखनऊ :
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावर देशवासीयांनी आवाज उठवल्यानंतर उत्तरप्रदेश सरकारने पोलीस अधीक्षकांसह सात अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. या प्रकरणात हाथरसचे पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक या दोघांचीही नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी केली जाणार आहे.
हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर सिंह, क्षेत्राधिकारी (सीओ) राम शब्द, पोलीस निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, उपनिरीक्षक जगवीर सिंग आणि महेश पाल यांच्यासह अन्य दोघांचे निलंबन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केली आहे.
14 सप्टेंबरला संबंधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. त्यावेळी तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाला. जीभ कापण्यात आली. गंभीर दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. 29 सप्टेंबरला सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडितेवर यूपी पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या परवानगीशिवाय अंत्यसंस्कार केले. त्यामुळे यूपी सरकार आणि पोलिसांविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे योगी सरकारने दोषींवर कारवाईला सुरुवात केली आहे.









