ऑनलाईन टीम / लखनऊ :
हाथरस येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात येत असल्याची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त मुख्य सचिव अविनिशकुमार अवस्थी आणि डीजीपी हितेशचंद्र अवस्थी यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीत या प्रकरणाचा तपास सोबीआयकडे सोपण्याचा निर्णय झाला.
दरम्यान, पीडितेच्या कुटुंबियांनी उत्तरप्रदेश सरकार आणि पोलिसांवर आमचा विश्वास नसून, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री योगी यांनी तपास सीबीआयकडे सोपविण्यात येत असल्याची घोषणा केली.
उत्तरप्रदेश सरकारकडून आम्हाला धमक्या येत आहेत. तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पदावरून हटवण्यात यावे, अशीही मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे केली होती.









