‘तृणमूल’च्या पथकालाही हाथरसच्या सीमेवर रोखले : पोलिसांनी धक्काबुक्की करून ओब्रायन यांना खाली पाडल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ लखनौ, नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार प्रकरणात राजकारण तीव्र झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर शुक्रवारी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या पथकाने पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गावी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस प्रशासनाने हाथरसच्या सीमेवर तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह संपूर्ण पथकाला रोखले. यादरम्यान पोलिसांनी धक्काबुक्की करून ओब्रायन यांना खाली पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच महिला पोलिसांनी पथकातील महिला सदस्यांचे कपडे खेचले आणि खासदार प्रतिमा मंडळ यांच्यावर लाठीमार केला, असा आरोप टीएमसीने केला आहे. तसेच याप्रकरणी राहुल गांधी, योगी आदित्यनाथ यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे या प्रकरणाला आता राजकीय घमासानाचे स्वरुप प्राप्त झालेले दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसचे पथक शुक्रवारी हाथरसच्या सीमेवर पोहोचताच तेथील पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत डेरेक ओब्रायन खाली पडले. मात्र, घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱयांनी तातडीने त्यांना उचलले. ‘आम्ही सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटायला चाललो होतो. पण आम्हाला परवानगी दिली जात नव्हती. जेव्हा आम्ही आग्रह धरला तेव्हा महिला पोलिसांनी आमचे कपडे खेचले. आमच्या खासदार प्रतिमा मंडळ यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला आणि त्या खाली पडल्या. यावेळी पुरुष पोलीस अधिकाऱयांनी त्यांना स्पर्श केला. हे लज्जास्पद आहे’, असा दावा ममता ठाकुर यांनी केला आहे.
‘पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेऊन शोक व्यक्त करण्यासाठी आम्हाला ममता बॅनर्जी यांच्यावतीने पाठविण्यात आले होते. ओळख दिली, तरी आम्हाला त्यांना भेटण्याची परवानगी दिली गेली नाही. उलट पोलिसांनी धक्काबुक्की केली. जर ते महिला खासदाराचा आदर करू शकत नाहीत तर सर्वसामान्यांची परिस्थिती काय असेल याची कल्पना करा, असा आरोप खासदार प्रतिमा मंडल यांनी केला.
असत्याशी सत्याने करणार मुकाबला : राहुल गांधी
सत्य आणि अहिंसेची ताकद जगाला दाखवून देणाऱया महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा देतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. आपण जगात कोणालाही घाबरणार नाही. असत्याचा मुकाबला सत्याने करणार. असत्याचा विरोध करताना कितीही कष्ट सहन करावे लागले तरी त्याची पर्वा करणार नाही, अशा अर्थाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. हाथरस येथे जाण्यासाठी निघालेल्या राहुल आणि प्रियंका गांधी यांना गुरुवारी पोलिसांनी नोएडा येथे अडविले होते. पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. जमावबंदीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून राहुल, प्रियंका गांधींसह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले. हाच धागा पकडत राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. अटकावर घटनेच्या दुसऱयाच दिवशी आलेल्या गांधी जयंतीचे औचित्य साधून राहुल यांनी सरकारला इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी गांधी तत्वज्ञानाचाच आधार घेतला आहे. सत्याची ताकद गांधीजींनी जगासमोर आणली. हिंसेने विरोध करण्यापेक्षा आत्मक्लेशाने प्रभावी परिणाम साधता येतो हे त्यांनी दाखवून दिले, असे ते म्हणाले.
महिलांचा सन्मान न करणाऱयांचा समूळ नाश निश्चित : योगी आदित्यनाथ
हाथरस येथे दलित मुलीवर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेवटी मौन सोडताना महिलांचा सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचविणाऱयांचा समूळ नाश निश्चित असून भविष्यात उदाहरण म्हणून प्रस्थापित होईल अशी शिक्षा त्यांना मिळेल, अशा शब्दांत कडक इशारा दिला आहे. प्रत्येक माता-भगिनीची सुरक्षा आणि विकास यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी राज्यातील जनतेला आश्वासन दिले आहे. वरील प्रकरणानंतर कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी योगी सरकारवर सतत हल्ला चढविला आहे. या घटनेनंतर प्रथमच या विषयावर ट्विटच्या स्वरूपात व्यक्त होताना योगी यांनी वरील इशारा दिला आहे.









