खानापूर / प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील ‘हाथरस’ येथे दलित महिलेवर अत्याचार करून तिला ठार केल्याप्रकरणी दोषी व्यक्तीला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी, तसेच महिलांचे रक्षण करू न शकणाऱया उत्तर प्रदेशमधील योगी सरकार व त्यांच्या अधिकाऱयांवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी खानापूर तालुका भीमसेना तसेच खानापूर तालुका बहुजन समाज पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन्ही संघटनांच्यावतीने तहसीलदार रेष्मा तालिकोटी यांना निवेदन सादर करण्यात आले.
भीमसेनेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमध्ये दलित महिला सुरक्षित नसून हाथरसमधील मनीषा वाल्मिकी या महिलेवर क्रूर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. तसेच तिचा मृतदेह घरच्या लोकांच्या स्वाधीन न करता परस्पर जाळण्यात आला. याला सर्वश्री योगी सरकार आणि त्यांचे अधिकारी कारणीभूत असून राष्ट्रपतींनी याची दखल घेऊन योगी सरकार बरखास्त करावे व त्या सरकार तसेच अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करावा, अशी भीमसेनेने निवेदनात मागणी केली आहे. निवेदन भीमसेना कार्याध्यक्ष राजू कांबळे यांनी सादर केले.
तर बहुजन समाज पक्षाने दिलेल्या निवेदनात दलित महिलेवर अत्याचार केलेल्या आरोपीना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, तसेच उत्तर प्रदेशातील दलितांचे रक्षण करण्यास योगी सरकार अयशस्वी ठरले आहे. यामुळे ते सरकार देखील बरखास्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन बहुजन समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष सिडलाप्पा मादार यांनी तहसीलदार रेष्मा तालीकोटी यांना देले. यावेळी तालुक्यातील विविध दलित संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









