‘कोविड-19’ च्या संक्रमणामुळे काही आरोग्यदायी सवयी हळूहळू जनमानसात रुजत आहेत ही एक सकारात्मक बाब म्हणता येईल. ‘हात धुणे’ ही त्यापैकी एक आरोग्यदायी सवय. गेल्या मार्च महिन्यात कोरोना भारतात आल्यापासून मुखपट्टी वापरणे, हात धुणे हे आरोग्यदायी वर्तनात्मक बदल घडवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. काही जनजागृतीच्या माध्यमातून तर काही कायद्याच्या अंमलबजावणीतून. हात धुण्याची सवय लागण्यासाठी, जाहिरातींचा प्रभाव मोठा राहिला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. योग्य पद्धतीने हात धुणे ही खरेतर अगदी साठ सेकंदांची प्रक्रिया. मात्र कंटाळा, आळस, दुर्लक्ष, पाण्याचे दुर्भिक्ष अशा अनेक कारणांमुळे आवश्यक त्यावेळी हात धुणे टाळले जाते. कित्येकजण सोयी-सुविधा असूनही हातांच्या स्वच्छतेची बाब हसण्यावारी नेतात. हातांच्या स्वच्छतेच्या अभावी अनारोग्याला आमंत्रण देणारे आपल्याकडेही कमी नाहीत. अविकसित तसेच विकसनशील देशांमध्ये पाणी आणि स्वच्छतेच्या अपुऱया सुविधांमुळे दरवषी 8,27,000 मृत्यु होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जगभरात 60… मृत्यु हे अतिसारामुळे होत असल्याचे ही आकडेवारी दर्शविते. प्रतिबंधात्मक आरोग्याच्या दृष्टीने हातांच्या स्वच्छतेचे असलेले महत्त्व ‘जागतिक हात स्वच्छता दिना’ च्या (5 मे 2021) निमित्ताने आजच्या लेखात जाणून घेऊया.
हात धुण्याची आरोग्यदायी सवय ‘कोविड-19’ मुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. याविषयी जगभरातून काही अभ्यास झाले आहेत, होत आहेत. ‘एन्व्हायर्न्मेंटल हेल्थ पर्सपेक्टीव्ह’ या मासिकात मागील वषी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार जगातील 25… लोकसंख्या ही हात धुण्याच्या परिणामकारक सुविधांपासून वंचित आहे. 1990 ते 2019 या कालावधीत सौदी अरेबिया, मोरोक्को, नेपाल, टांझानिया या देशांनी हात धुण्याच्या सुविधा वाढवण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. जवळपास 46 देशांमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना हात धुण्यासाठी पाणी आणि साबण उपलब्ध होत नसल्याचे सदर अभ्यासात म्हटले आहे. भारतातील 50 कोटी लोकांपर्यंत हात धुण्याची योग्य सुविधा नसल्या कारणाने कोरोना पसरवण्यास ते कारणीभूत ठरू शकतात असेही या अभ्यासात म्हटले आहे.
हात धुण्याची सवय ही स्थान, जात, धर्म, आर्थिक स्थिती, शिक्षण, लिंगपरत्वे वेगवेगळी असलेली दिसून येते. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या अहवालात असलेल्या माहितीनुसार जेवणाआधी हात धुण्याचे प्रमाण ग्रामीण भागात 25.3… तर शहरी भागात 56… आहे. शौचास जाऊन आल्यानंतर हात धुण्याचे प्रमाण ग्रामीण भागात 66.8… आणि शहरी भागात 88.3… आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 4 नुसार हात धुण्याच्या सुविधांच्या उपलब्धतेत जातीपरत्वे तफावत असल्याचे दिसून येते. अनुसूचित जमातींमध्ये 38.4… तर अनुसूचित जातींमध्ये 51.9… इतक्मयाच प्रमाणातील लोकसंख्येला हात धुण्यासाठीच्या पाणी, साबणासारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध होतात. गरीब कुटुंबांमध्ये केवळ 24.3… लोकांना हात धुण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध होतात. सधन कुटुंबांमध्ये हेच प्रमाण 93.3… आहे. शिक्षणानुसार उच्च शिक्षितांमध्ये 84.6… तर अल्पशिक्षित वा निरक्षरांमध्ये 42.8… लोकांना हात धुण्याची साधने उपलब्ध होतात. ‘वॉटर एड इंडिया’ या संस्थेने 2017 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार पुरुषांपेक्षा महिला त्यांच्या हातांच्या स्वच्छतेची अधिक काळजी घेत असल्याचे दिसून आले आहे. हात धुण्याच्या संसाधनांची उपलब्धता, हात धुण्याच्या प्रक्रियेचे पालन, हातांमार्फत आजारांचे संसर्ग वाढण्याची स्थिती (जसे सध्याचा कोरोनाकाळ), जोखीमयुक्त घटकांच्या हात धुण्याच्या सवयी व संसाधन उपलब्धता, सर्वसामान्यांमधील हात धुण्याच्या आरोग्यदायी वर्तनाची सवय इत्यादी विषय घेऊन सखोल अभ्यास होण्याची गरज आहे.
हातांची स्वच्छता राखायची झाल्यास ‘पाणी’ हा मूलभूत घटक आहे. मुख्य शहरांना लागून असलेली उपनगरे, झोपडपट्टय़ा, ग्रामीण, दुष्काळप्रवण भागात पाण्याचे दुर्भिक्ष आजही आहे. ‘कोविड-19’ चे संक्रमण सुरू झाल्यापासून मागील दोन वर्षात वृत्त वाहिन्यांवरून दुष्काळाच्या बातम्यांचे प्रसारण लक्षणीयरित्या कमी झाले असल्याने कदाचित आपल्याला त्याचा विसर पडला असावा. कोविड-19 संक्रमण काळात हातांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्थांकडून साबण वाटण्याचे उपक्रम झाले. पाणी या महत्त्वाच्या घटकाबाबत आपले लक्ष मर्यादित राहते. कोरोना संक्रमणाच्या काळात ग्रामीण भागात घर असो वा शाळा, लहान मुलांकडून हात धुण्याच्या वर्तनाचा इतका अतिरेक पहायला मिळाला की पालक आणि शिक्षक कंटाळून गेले. त्यामुळे हा उपक्रम मर्यादित काळापुरताच राहिला. शहरी भागात हात धुण्याच्या अतिरिक्त सवयीमुळे मूलतः मनात असलेल्या संसर्गाच्या अतिरिक्त भीतीमुळे काहीजण ‘ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसिजेज’सारख्या मानसिक विकारांना बळी पडल्याची उदाहरणे आहेत. हे टाळण्यासाठी लोकांपर्यंत वर्तणूक बदलाचा योग्य संवाद (बिहेव्हिअरल चेंज कम्युनिकेशन) जाणे गरजेचे आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत लोकांमध्ये वर्तणुक बदलासाठीचा संवाद कार्यक्रम आपल्याकडे होत आहे. असा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर राबविणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. शासन आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा सेविकांपर्यंत आणि त्यांच्यामार्फत सर्वसामान्य लोकांपर्यंत हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व पोचवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याला संयत वर्तन, हात धुण्याची योग्य पद्धत आणि संसाधनांचे व्यवस्थापन याची जोड देणे गरजेचे आहे.
योग्य पद्धतीने हात धुणे हा कोरोना संसर्गाच्या प्रसारामध्ये एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणाऱयांसाठी हातांची स्वच्छता ठेवणे ही अत्यावश्यक मूलभूत सवय आहे. यालाच अनुसरून जागतिक आरोग्य संघटनेने ‘जागतिक हात स्वच्छता दिना’चा विषय ‘सेकंद प्राण वाचवतील-आपले हात स्वच्छ ठेवा’ (सेकंड्स सेव लाईव्ज्का्लीन युवर हॅण्ड) असा ठेवला आहे. आरोग्य सेवेमध्ये प्रत्यक्ष रुग्णांसोबत काम करणाऱयांसाठी हात केव्हा केव्हा धुवावे याबाबत काही संकेत जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिले आहेत. रुग्ण सेवा करणाऱयांनी रुग्णांना हात लावण्यापूर्वी, रुग्णांना (स्पॉन्जिंग) स्वच्छ करण्यापूर्वी, रुग्णांच्या जखमा स्वच्छ करण्यापूर्वी, रुग्णाचे मलमूत्र साफ केल्यानंतर, रुग्णाला आणि त्याच्या वस्तूंना स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत, असे हे संकेत आहेत. कोरोनोत्तर काळात शाळा, महाविद्यालये, कार्यालये पुन्हा सुरू होतील. ‘न्यू नॉर्मल’मध्ये ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ अशी स्थिती होता कामा नये. हात धुण्यामुळे आपण केवळ कोरोनाच्या संसर्गालाच आळा घालत आहोत असे नव्हे तर अतिसार, कावीळ, पचनसंस्थेचा संसर्ग अशा अनेक आजारांवर भविष्यात आपल्याला मात करावयाची आहे. औषधोपचारांवर होणारा खर्च, रुग्णालयातील वास्तव्यामुळे बुडणारा रोजगार, आरोग्य व्यवस्थेवरील ताण या सर्वांच्या तुलनेत ‘हातांची स्वच्छता’ हे प्रतिबंधात्मक पाऊल कितीतरी पटीने स्वस्त आणि सोयीस्कर नाही का?








