यापूर्वीही घडल्या आहेत घटना, अनेक प्रकरणांचा अद्याप तपास नाही
प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी दुपारी किल्ला खंदकाजवळ आढळून आलेले मानवी पाय कोणाचे? याचा अद्याप उलगडा झाला नाही. सोमवारी बिम्समधील विधिविज्ञान तज्ञ त्या पायांची तपासणी करणार असून तपासणीनंतरच ते स्पष्ट होणार आहे. सध्या दोन्ही पायांमध्ये किडे पडले आहेत. त्यामुळे ते शीतागारात ठेवण्यात आले आहेत. सोमवारी ते पाय पुरुषाचे आहेत की महिलेचे? याची तपासणी करण्यात येणार आहे.
यापूर्वी बेळगाव परिसरात मानवी अवयव सापडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यापैकी काही प्रकरणांचा तपास लागला आहे तर काही प्रकरणे अद्याप धसास लागलेली नाहीत. पाच वर्षांपूर्वी किल्ल्यानजीक एका महिलेचे हात व पाय सापडले होते. या प्रकरणाचा अद्याप तपास लागला नाही.
18 मार्च 2014 रोजी जिजामाता चौक परिसरातील एका रसवंतीगृहाशेजारी अनोळखी महिलेचे धडापासून वेगळे केलेले हातपाय आढळले होते. प्लास्टिकच्या पिशवीत घालून ते जाळण्याचाही प्रयत्न झाला होता. पोलिसांनी त्याच दिवशी हे दोन्ही अवयव ताब्यात घेऊन तपास हाती घेतला होता. हातपाय सापडले तर धड आणि शीर कुठे आहे? यासाठी तपास करण्यात आला. तेरा दिवसांनंतर 30 मार्च 2014 रोजी यरमाळ-नागराळ रस्त्यावरील एका पुलाच्या पाईपमध्ये शीरविरहित महिलेचे धड सापडले. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात यासंबंधी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास हाती घेण्यात आला. किल्ल्याजवळ हातपाय व पुलाखाली पोत्यात बांधून टाकून देण्यात आलेले धड एकाच महिलेचे असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मार्केट पोलीस स्थानकात दाखल झालेले प्रकरण तपासासाठी बेळगाव ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाली तरी अद्याप अत्यंत अमानुषपणे शरीराचे तुकडे करून खून करण्यात आलेली महिला कोण? याचा उलगडा झाला नाही. त्याचे शिरही अद्याप सापडले नाही. पोलिसांनी नंतरच्या काळात या प्रकरणाचा तपासच गुंडाळल्याची माहिती मिळाली आहे. आता शनिवारी 4 जानेवारी रोजी किल्ल्याजवळ आढळून आलेले मानवी पाय कोणाचे? याचा उलगडा होणार की या प्रकरणाचा तपास रखडणार, असा संशय निर्माण झाला आहे.
दरम्यान, मार्केट पोलिसांनी बिम्सच्या फोरेन्सिक तज्ञांना रविवारी एक पत्र दिले असून किल्ल्याजवळ सापडलेले पाय महिलेचे आहेत की पुरुषाचे, त्या व्यक्तीचे वय किती आहे, किती दिवसांपूर्वी त्याचा खून झाला आहे, पाय धडावेगळे करण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर झाला आहे? आदी प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. याबरोबरच डीएनए प्रोफाईल राखून ठेवण्यासाठी पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
अशोक मुडलगी खून प्रकरणाची आठवण
एखाद्या व्यक्तीच्या खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळय़ा भागात ते टाकून देण्याचे तंत्र अवलंबिले जाते. पोलिसांना चकवण्यासाठी व तपास यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी असे प्रकार केले जातात. काही वेळा चेहऱयावर पेट्रोल किंवा ऍसिड ओतून चेहरा विद्रुप करण्याचे प्रकारही होतात. वीस वर्षांपूर्वी खडेबाजार येथील अशोक मुडलगी यांचा अनैतिक संबंधातून खून झाला होता. त्यांच्या घराजवळच राहणाऱया डॉ. झियान नामक एका डॉक्टराने हा खून केला होता. हातपाय तोडून बळ्ळारी नाल्यात तर धड मच्छेजवळ टाकून देण्यात आले होते. मार्केट पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करून तत्कालिन पोलीस निरीक्षक एफ. ए. त्रासगर यांनी या खून प्रकरणाचा उलगडा केला होता. डॉक्टराला अटक करून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात त्याला शिक्षाही झाली आहे. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी सापडलेले मानवी अवयव कोणाचे? याचा मात्र उलगडा झाला नाही. शनिवारी सापडलेले पाय कोणाचे, याचा तपास करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे.









