प्रतिनिधी/पेठ वडगाव
भादोले (ता.हातकणंगले) येथील एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. यामुळे भादोले व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही महिला व तिचा पती मुंबईहून आली होते. त्यांना भादोले येथील शाळेत संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. या महिलेच्या संपर्कात दहा ते ते बारा जण आले असून स्वॅब घेण्याकरिता ताब्यात घेण्यात आले आहे.
भादोले (ता.हातकणंगले) येथील चांदोली वसाहतीतील महिला व तिचा पती गेल्या पाच दिवसापूर्वी मुंबईहून भादोले येथे आले होते. पती मुंबई येथे नोकरीस होता. आठ दिवसापूर्वी भादोले येथे आल्यानंतर त्यांचे स्वॅब सीपीआर कोल्हापूर रुग्णालयात घेण्यात येवून भादोले येथे जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. पाच दिवसानंतर शुक्रवारी त्यांचे रिपोर्ट आले यामध्ये महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला तर पतीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.
महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर ही माहिती ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रास सीपीआर प्रशासनाने दिल्यानंतर भादोले गावात एकच खळबळ उडाली. ही महिला मुंबई येथून आल्यानंतर ती प्रथम घरी गेली त्यानंतर त्यांना सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले. ही महिला अलगीकरणात ठेवलेल्या ठिकाणी दहा ते बारा जणांच्या व नातेवाईकांच्या संपर्कात आली असून त्यांचे स्वॅब घेण्यात येणार असून त्यांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ बैठक घेवून गावात विविध दक्षता व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ही महिला अलगीकरणात असलेल्या शाळेचा परिसर वडगाव पोलिसांनी सील केला असून गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुविधा देण्यासाठी अलगीकरणात संपर्कात आलेल्या लोकांना तपासणीस नेल्याने गावातील लोकांनी धास्ती घेतली आहे.
दरम्यान वडगाव परिसरातील दरवेश पाडळी येथील मुंबई येथे उपचारासाठी गेलेली एक महिलाही दोन दिवसापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह तर आज भादोलेत अलगीकरणात असलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह आली असून वडगाव परिसरातील भादोले व पाडळी या गावात दोन रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने वडगाव शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.