प्रतिनिधी/ वास्को
दरवर्षी दाबोळी विमानतळावरून थेट मक्काला रवाना होण्यासाठी उडणारे विमान यंदा हवाई वाहतुकीवरील निर्बंधांमुळे हाज यात्रेकरूंसाठी उपलब्ध होणार नाही. या गैरसोयीमुळे मुस्लीम अल्पसंख्यकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. या गैरसोयीचा फटका गोव्यातील हाज यात्रेकरूंबरोबरच शेजारच्या कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील यात्रेकरूंनाही बसणार आहे. आता सर्वांना मुंबई गाठावी लागणार आहे.
गोवा, महाराष्ट व कर्नाटकमधील हाज यात्रेकरूंची गरज ओळखून काही वर्षांपूर्वी सरकारने दाबोळी विमानतळावरून हाज यात्रेकरूंसाठी थेट विमानसेवा उपलब्ध केली होती. यंदा कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर निर्बंध आलेले असल्याने हाज यात्रेकरूंच्या हवाई सेवेवरही परीणाम झालेला आहे. यंदा दाबोळीवरून हाज यात्रेकरूंसाठी विशेष सेवेचे उड्डाण होणार नाही. त्यामुळे त्यामुळे गोव्यातील व गोव्याशेजारच्या कर्नाटक व महाराष्ट्राच्या काही भागातील शेकडो यात्रेकरूंना मुंबई गाठावी लागणार आहे. हा प्रवास त्यांच्यासाठी त्रासदायक, खर्चिक आणि वेळ वाया घालणारा असल्याने हाज यात्रेकरूंमध्ये नाराजी पसरलेली आहे.
यासंबंधी माहिती देताना काँग्रेसचे नेते सैफुल्ला खान यांनी नाराजी व्यक्त करून काँग्रेस सरकारच्या काळात हाज यात्रेकरूंसाठी ही थेट मक्कापर्यंतची सेवा उपलब्ध करण्यात आली होती. ती एकदा खंडीत झाली तर पुन्हा सुरू होणे कठीण होईल. गोव्यातून दरवर्षी दोन विमाने हाज यात्रेकरूंसाठी मक्काला उड्डाण करतात. गोव्यातील गोव्यातील दीडशेहून अधिक तर शेजारच्या राज्यातील यात्रेकरू सहभागी होत असतात. त्यामुळे या यात्रेकरूंसाठी किमान एक हवाई सेवा तरी दाबोळी विमानतळावरून उपलब्ध व्हायला हवी. या यात्रेसाठी मुंबईपर्यंतचा प्रवास करणे विशेषता वृध्दांसाठी फार गैरसोयीचे होणार असल्याचे सैफुल्ला खान म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नझीर खान यांनी ऐनवेळी हाज यात्रेकरूंची सेवा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. हा प्रकार अन्यायकारक आहे. दाबोळीतील हवाई सेवा रद्द केल्याने गोवा आणि कर्नाटकातील हाज यात्रेकरूंना चार दिवस आधीच महाराष्ट्र राज्याचा प्रवास करावा लागणार आहे. गोवा राज्य हाज समितीचे अध्यक्ष शेख जीन्हा यांनी या गैरसोयीची दखल घेऊन ही सेवा पुन्हा उपलब्ध करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करावे. राज्य व केंद्र सरकारसमोर हा प्रश्न मांडावा अशी मागणी खान यांनी केली. शेख जीना केंद्रीय हाज समितीवरही सदस्य आहेत. गोव्यात व केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. हाज यात्रेकरूंची गैरसोय दूर करणे त्यांना शक्य आहे. ही गैरसोय दूर करणे त्यांना शक्य होत नसल्यास त्यांनी गोवा राज्य हाज समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनाम देणेच योग्य ठरेल असे नझीर खान म्हणाले. यापूर्वी राज्य सरकारने गोव्यातील व शेजारच्या राज्यातील हाज यात्रेकरूंसाठी दाबोळी विमानतळाच्या जवळपास हाज गृह बांधण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासनही पूर्ण झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
वास्कोतील एक समाजसेवक रियाझ कद्री यांनीही हाज यात्रेकरूंसाठीची हवाई सेवा रद्द करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकारने या गोष्टीचा पुनर्विचार करायला हवा. शेख जीना हे गोवा राज्य हाज समितीचे अध्यक्ष व अखिल भारतीय हाज समितीचेही सदस्य असल्याने त्यांनी या गैरसोयीचा पाठपुरावा करावा व पुन्हा हवाई उड्डाणाची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली.









