एनडीएकडून पक्षावर अन्याय होत असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे (‘आरएलजेपी’) प्रमुख पशुपती पारस यांनी शुक्रवारी दिल्लीत मोठे विधान करत एनडीएने आपल्या पक्षावर अन्याय केल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर त्यांनी आपला पुतण्या चिराग पासवान यालाही लक्ष्य केले. आमचा पक्ष दलितांचा पक्ष असून आम्ही 5 खासदार आहोत, असे ते म्हणाले. बिहारमध्ये तिघांना तिकीटे नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. आपण भाजपची पुढील यादी येण्याची वाट पाहत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी आपण हाजीपूरमधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपल्या पक्षाचे अन्य खासदारही आपापल्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपच्या बड्या नेत्यांनी पुन्हा विचार करावा. आम्ही आजपर्यंत एनडीए आघाडीचा भाग आहोत. आम्ही प्रामाणिकपणे मैत्री जपली. मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्र्यांचा आदर करतो. तरीही एनडीएने आमच्या पक्षाला प्राधान्य न दिल्यामुळे पक्षात नाराजी आहे. आमचे 5 खासदार अजूनही उमेदवारीची प्रतीक्षा करत असून अन्याय झाल्यास आम्हाला अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल, असे पारस पुढे म्हणाले. ‘आरएलजेपी’ संसदीय मंडळाची बैठक पशुपती पारस यांच्या दिल्लीतील निवासस्थानी नुकतीच झाली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पशुपती पारस, संसदीय मंडळाचे अध्यक्ष सूरजभान सिंह, खासदार राजकुमार राज, खासदार चंदन सिंह आणि संसदीय मंडळाचे अन्य सदस्य उपस्थित होते.









