साहित्य अकादमी पुरस्कार विजेते संजीव वेरेंकर यांचा विश्वास
प्रतिनिधी /पणजी
समाजामध्ये भोंदुगीरी करणाऱयांची आजच्या सुशिक्षित, आधुनिक युगातही कमी नाही. लोकांच्या असहायतेची संधी साधून अशिक्षितच नव्हे, तर सुशिक्षित लोकांनाही फसविले जाते. या प्रवृत्तीविरुद्ध लढण्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न राजू भिकारो नाईक यांनी ‘हांव भगवंताचो अवतार’ नाटकामधून दिला आहे. एका पत्रकारांने दिलेली ही झुंज गोव्यातील रंगभूमीवर जबरदस्त, बंडखोर नाटक म्हणून गाजणार आहे, असा विश्वास ज्येष्ठ कवी, पत्रकार तथा नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेले संजीव वेरेंकर यांनी व्यक्त केला.
‘हांव भगवंताचो अवतार’ नाटय़पुस्तकाचा प्रकाशन सोहळा श्री वनदेवी मुकोबा देवस्थान, मळार-ओल्ड गोवा येथे पार पडला. वेरेंकार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना वरील उद्गार काढले. ते पुढे म्हणाले की जे नाटक वाचतानाच आपल्याला उच्च अनुभूती येते, एक मोठा विचार डोक्यात लख्ख प्रकाश पाडून जातो, त्या नाटकाचा प्रयोग जबरदस्त दर्जेदार होणार यात कोणताच संदेह नाही, असेही ते म्हणाले.
व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक, अभिनेत्री, चित्रपटनिर्मात्या सौ. ज्योती कुंकळकर, ओल्ड गोव्याचे माजी सरपंच, विद्यमान पंच तथा श्री वनदेवी मुकोबा देवस्थानचे अध्यक्ष नीळकंठ (निरी) भोमकर, पर्वरीतील समाजकार्यकर्ते, उद्योजक देवानंद नाईक हजर होते.
कसदार, लोकप्रिय नाटककार
गोव्यात नाटय़क्षेत्रात पुंडलिक नाईक, विष्णू वाघ यासारखे कसदार, लोकप्रिय नाटककार असून राजू नाईकही त्याच धारेतील तडफदार नाटय़लेखक आहेत. पत्रकारितेसारख्या व्यस्थ क्षेत्रात प्रभावीपणे कार्यरत राहूनही त्यांनी अत्यंत कठीण असे हे नाटय़लेखन यशस्वीपणे सिद्ध केले आहे. गोव्याच्या रंगभूमीवर या नाटकाने याअगोदरच यश मिळविलेले असून आता यापुढेही त्याचे प्रयोग गावागावात होतील. यशस्वी मुलाखतकार म्हणूनही नाईक यांनी नावलौकिक मिळविला असून गोवा तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती वाचनीय, श्रवणीय आहेत, असे ज्योती कुंकळकर म्हणाल्या.
साहित्यनिर्मिती हीच खरी श्रीमंत
राजू नाईक यांनी साहित्यात आणि पत्रकारितेतही स्वतःचे वेगळेपण जपले आहे. सरस्वती प्रसन्न असल्याने त्यांनी जी विपुल साहित्यनिर्मिती केली, तीच त्यांची खरी श्रीमंती आहे. कार, बंगले, कोटी अनेकांकडे असतात, पण नाईक यांच्याकडे जी श्रीमती आहे, ती काही अवघ्याच लोकांकडे असते, असे उद्गार देवानंद नाईक यांनी यावेळी काढले.
हांव भगवंताचो अवतार… मोठे योगदान
नाईक हे आमच्या गावचे आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. ओल्ड गोव्यात 96 टक्के मते घेऊन निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आणि जे कार्य केले त्याचाही आम्हाला अभिमान आहे. काव्य, कथा, नाटक, बातमी किंवा लेख या सर्व प्रकारात लेखन करताना त्यांच्या अभ्यासपूर्णता ही आपल्याला सातत्याने भावलेली आहे. ‘हांव भगवंताचो अवतार’ नाटक गोमंतकीय रंगभूमीसाठी मोठे योगदान ठरणार आहे, असा विश्वास नीळकंठ भोमकर यांनी व्यक्त केला.
पाहुण्यांचे स्वागत शांताराम भिकारो नाईक यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते समई प्रज्वलन झाले. कविता राजू नाईक, भक्ती नितीन माशेलकर, रेशमी मंगेश नाईक, योगिता रोहिदास करमळकर, मेधा मोहन काणकोणकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. छायापत्रकार सतिश कुंकळकर, उमेश बाणस्तारकर, पुष्पराज पोपकर यांचा सन्मान करण्यात आला. कविश राजू नाईक, लक्षता लक्ष्मीकांत नाईक, दीपाली मंगेश नाईक, देतिशा मंगेश नाईक, संचिता नितीन माशेलकर यांनी पाहुण्यांना स्मृतीभेट प्रदान केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध नाटय़-सिने-तियात्र अभिनेते प्रदीप आनंद नाईक यांनी केले. प्रास्ताविक व ऋणनिर्देश राजू भिकारो नाईक यांनी केला.









