ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
चीनच्या नियंत्रणात असलेल्या हाँगकाँगला संरक्षण साहित्य आणि तंत्रज्ञान निर्यात करण्यास अमेरिकेेेने बंदी घातली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी आज यासंदर्भात घोषणा केली.
हाँगकाँगसाठी तयार करण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदामंगळवारी चिनी संसदेत मंजूर केला. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. हाँगकाँग हे जगातील महत्वाचे वित्तीय केंद्र आहे. 1997 मध्ये ब्रिटिशांची वसाहत असलेले हाँगकाँग चीनकडे सोपवण्यात आले. तेव्हापासून हाँगकाँग चीनच्या नियंत्रणात आहे. चीनच्या नियंत्रणात असले तरी हाँगकाँगचे कायदे वेगळे आहेत. त्यामुळे चीनला तेथील कारभारात हस्तक्षेप करता येत नव्हता. तिथे चीनच्या कम्युनिस्ट राजवटीची हुकूमशाही तिथे चालत नव्हती.
आता हाँगकाँगसाठीचा राष्ट्रीय सुरक्षा कायदा चिनी संसदेत मंजूर झाल्याने चीन आता आपल्या पद्धतीने हाँगकाँगचा कारभार करू शकणार आहे. अमेरिकेकडून हाँगकाँगला निर्यात केले जाणारे संरक्षण साहित्य आणि तंत्रज्ञान याचा वापर चीन करू शकतो, त्यामुळे अमेरिकेने या साहित्याच्या निर्यातीवर बंदी आणली आहे.









