ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबानकडून सरकार स्थापनेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सरकारमधील नेत्यांची नावेही निश्चित झाली आहेत. तालिबानचे सर्वोच्च नेते मुल्ला मोहम्मद हसन अखुंड हे अफगाणिस्तानच्या पंतप्रधान असतील. मुल्ला अखुंडजादाने मोहम्मद हसन अखुंड यांचे नाव या पदासाठी सुचवलं आहे. तसेच देशात दोन उपपंतप्रधान असणार आहेत. त्यासाठी मुल्ला बरादर आणि मुल्ला अब्दुस सलाम यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
अफगाणिस्तानच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी सिराज जुद्दीन हक्कानीकडे असेल. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रलायाचे नेतृत्व मुल्ला अमीर खान मुत्ताकींकडे सोपवण्यात येणार आहे. तसेच जागतिक स्तरावरील प्रसारमाध्यमांना देशातील घडामोडींची माहिती देणारा जबीउल्लाह मुजाहिदीन हा अखुंड यांचा अधिकृत प्रवक्ता म्हणून काम करणार आहे. दरम्यान, सरकार स्थापनेसाठी तालिबानने चीन, पाकिस्तान, रशिया, इराण, कतार आणि तुर्कस्तान या देशांना निमंत्रण पाठवले आहे.









