माणसाने खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हवेच्या संपर्कात येणाऱया एअरोसोल मायक्रोड्रॉपलेट्स (हवेतील अतिसुक्ष्म थेंब) कोरोना विषाणू संक्रमण फैलावण्यासाठी विशेष जबाबदार नसतात, असे एका नव्या अध्ययनातून समोर आले आहे. जर्नल ‘फिजिक्स ऑफ फ्ल्यूड’मध्ये प्रकाशित अध्ययनानुसार बंद ठिकाणी सार्स-सीओवी-2चा एअरोसोल प्रसार विशेष प्रभावी नसतो.
कोरोना विषाणू संक्रमणाची सौम्य लक्षणे असलेला व्यक्ती काही वेळापूर्वी उपस्थित असलेल्या ठिकाणी एखादा व्यक्ती गेला असल्यास त्याला संक्रमण होण्याची शक्यता कमी असते. संबंधित व्यक्ती केवळ संभाषण करत असल्यास ही शक्यता अधिकच कमी होते असेही संशोधकांनी नमूद केले आहे. एअरोसोल प्रसार शक्य असला तरीही तो अधिक प्रभावी नसतो, विशेषकरून लक्षणरहित अथवा सौम्य लक्षणेयुक्त बाधितांच्या बाबतीत ही शक्यता खूपच कमी असते असे दिसून आले आहे. अतिसुक्ष्म थेंब असल्याने त्यांच्यात विषाणूंची संख्या कमी असते. याचमुळे संक्रमणाचा फैलाव होण्याचा धोका कमी असल्याचे ऍमस्टरडॅम विद्यापीठातील अध्ययनाचे सह-लेखक डॅनियल बॉन यांनी म्हटले आहे.









